सांगली: गावातीलच एका तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील खंडेराजुरी गावात घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय.
साहिल बबन डफेदार (वय 21) असे संशयित तरुणाचे नाव आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने 17 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर तात्काळ तरुणीला अत्यवस्थ अवस्थेत रूग्णालयात दाखल केले होते. मात्र रात्री उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. साहिल बबन डफेदार हा सुमारे चार-पाच महिन्यापासून तरुणीला छेडछाड करण्याच्या उद्देशाने फिरत होता. मुलीने साहिल हा खंडेराजूरी गावात मिरज बसस्टँड परीसरात माझ्या पाठीमागे सारखा फिरत असल्याचे कुटुंबाने सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या घरातील लोकांनी साहिलला ताकीद दिल्यानंतर काही दिवस साहिलने तरुणीला त्रास दिला नाही.
बदनामीच्या भीतीने संपवली जीवनयात्रा
कुटुंबाच्या तंबीनंतर देखील 16 जुलैपासून पुन्हा तो तरुणीला त्रास देऊ लागला. यामुळे तरुणी प्रचंड दडपणाखाली होती. त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी तरुणीने साहिल पुन्हा त्रास देऊ लागल्याने आणि तो असह्य झाल्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. बदनामीच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांनी साहिल बबन डफेदार याने मानसिक त्रास देऊन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिलीय.
कुटुंबावर शोककळा
मयत तरुणीला आरोपी नाहक त्रास देत होता. सततच्या त्रासाला ती कंटाळली होती. तिने आई-वडिलांना छेडखानी होत असल्याबाबत माहिती दिली होती. तिच्या आई-वडिलांनी आरोपीची समजूतही घातली. तसेच त्याच्या आई-वडिलांची भेट घेऊन आपल्या मुलाला समज देण्याबाबत देखील कळवले. परंतु त्रास काही कमी होत नसल्याने ऋतुजाने जीवनयात्रा संपविली. टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेत उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणीने अक्कल गहाण टाकली, ऑनलाईन पूजाअर्चेच्या नावाखाली भोंदूबाबाने लावला 18 लाखांचा चुना