Pune Crime News: एक उच्चशिक्षित 21 वर्षीय तरुणी जी अमेरिकेतील शिकागो याठिकाणी शिक्षण घेते, ती एका भोंदू बाबाच्या नादाला लागली अन् 18 लाख रूपये गमावून बसल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या फसवणुकी (Pune Crime News) प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात कलम 406, 420 आणि 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अभयकुमार आमळे (रा.पिंपरी चिंचवड) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा संपूर्ण प्रकार नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय फिर्यादी तरुणी ही अमेरिकेतील शिकागो शहरात शिक्षण घेते. तिला ऑनलाईन पूजापाठ आणि जप करून देतो असे सांगत आरोपीने फिर्यादी तरूणीला विश्वासात घेतलं. तसेच हे पूजापाठ आणि जप करून घरातील अडचणी सोडवतो असंही आरोपीने सांगितले. पूजा झाल्यावर काही रक्कम परत करतो असे आश्वासन सुद्धा दिले होते. या सर्व भुलथापाला बळी पडून तरुणीने आरोपीला 11 लाख 83 हजार रुपये दिेले. 


याशिवाय फिर्यादी जेव्हा भारतात परत आली तेव्हा तिला भेटून तिच्याकडून सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे सुद्धा घेतले. भारतात आल्यावर फिर्यादीला पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून तिचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा 5 लाख 59 हजाराचा ऐवज तिच्याकडून काढून घेतला. याशिवाय रोख 2 लाख 82 हजार रुपये देखील काढून घेतली.


दरम्यान या सर्व घटनेनंतर फिर्यादीने आरोपीकडे आजवर दिलेली रोख रक्कम आणि दागिने परत मागितले असता आरोपीने फिर्यादीचे फोटो मॉर्फ (Pune Crime News) करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादींनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.