Sangli Bajar Samiti : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व राखल आहे. इस्लामपुरात राष्ट्रवादीने सत्ता राखली असून विटा बाजार समितीत काँग्रेस, भाजप, शिंदे गटाची एकत्रित सत्ता असेल. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ऐक्याने दणदणीत विजय
सांगली बाजार समितीवर महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला असून एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ऐक्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनेलला हा मोठा विजय मिळाला. या निवडणुकीत भाजप मंत्री पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील यांना मात्र पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली आहे.
या निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या भाजप पॅनलचा धुव्वा उडाला. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत मिळवला. इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येत आघाडी उभे केली होती. अनेक वर्षांपासून आपली सत्ता एकहाती राखण्यात जयंत पाटील यांना यश मिळाले आहे. सर्व पक्ष एकत्रित आले असताना जयंत पाटलांनी इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हाती सत्ता मिळवलेली. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
विटामध्ये राष्ट्रवादीला धक्का
विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत झाले आहे. या ठिकाणी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. सर्व 18 जागांवर शिवसेना, भाजप,काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम व भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अरुण लाड, राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.मात्र एकही जागेवर राष्ट्रवादीला यश मिळालं नाही.
पाचपैकी दोन बाजार समित्यांमध्ये आता काँग्रेस,राष्ट्रवादीची सत्ता आली आहे, तर एक ठिकाणी शिवसेना काँग्रेस भाजप यांच्या आघाडीची सत्ता आली आहे. उद्या (30 एप्रिल) तासगाव आणि आटपाडी बाजार समितीसाठी मतदार आणि मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे या समित्यांमध्ये कुणाचं वर्चस्व असणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या