Jayant Patil : अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेने राज्यभर चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe on Jayant Patil) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केल्यानं राजकीय भूवया उंचावल्या. त्यांनी एवढ्यावर न थांबता जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना लोकसभेत पाठवा, असं आवाहनही केलं. कोल्हे यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजितदादांच्या नेतृत्वात विधिमंडळात 54-55 आमदार आहेत. पुढील काळात आमचा पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष केंद्रित असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांनी केलेल्या भाकरीच्या विधानावर ते म्हणाले की, शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल.


जयंत पाटलांचे स्पष्टीकरण


खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमताने चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं ते विधान प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी होतं. मात्र, उद्देश काही नाही. अजितदादा आणि माझ्यात किंवा पक्षात कोणाशीही स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे केवळ मत इथंपर्यंतच या गोष्टी मर्यादित आहेत. 


सांगलीत अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री होऊ शकतात, असे विधान केल्यानंतर राजकीय चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील म्हणाले, की माझ्या सत्काराच्या भाषणात त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. कोणाशी स्पर्धा करण्यासाठी मत नाही. राज्यात पोस्टर लागली, पण महाराष्ट्रामध्ये उत्साही कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याचे अजितदादा आणि आम्हाला माहीत आहे. आमच्यात वाद नाही. 


एकनाथ शिंदे माझ्या संपर्कात 


ठाकरे सेनेतील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. सोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार व काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटल्यानंतर जयंत पाटील यांनी टोला लगावला. एकमेकांच्या संपर्कात सगळेच असतात. तसे एकनाथ शिंदेही माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात ते खोटे नाही. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवार साहेब व्यवस्थित सांभाळतात. मला पक्षाची जबाबदारी दिली असून मी सांभाळत आहे. पक्षाची ताकद वाढल्याशिवाय पक्ष मोठा झाल्याशिवाय पुढील स्वप्ने कोणी बघू नयेत.


इतर महत्वाच्या बातम्या