Ramdas Athawale : सध्या महाराष्ट्राच्या राजकरणात (Politics) बरीच उलथापालथ पहायला मिळत आहे. प्रत्येक राजकिय पक्षाची वक्तव्यं ही रोज काहीतरी नवं समीकरण पहायला मिळत आहे. त्यात आता मुख्यमंत्रीपदावरुन सुरु असलेली चढाओढ महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजवत आहेत.  त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (R amdas Athvale) यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. 


रामदास आठवले हे त्यांच्या कवितांमुळे तर चर्चेत असतातच परंतु त्यांची वक्तव्यं देखील राजकीय वर्तुळात रंगतात. त्यातच राज्यात सुरु असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चढाओढीत रामदास आठवले यांनीदेखील उडी मारली आहे. 'मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय' असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद असल्याचंही आठवले यांनी म्हटलयं. सांगलीमधील पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. 


'अजितदादांना संधी मिळेल असं वाटत नाही' 


अजित पवारांमुळे सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, 'अजितदादांना तिकडे संधी मिळेल असे वाटत नाही. आम्हाला अजितदादांची आवश्यकता नाही' असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याचं आठवले यांनी म्हटलं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही ती संधी मिळणार नसल्याचं स्पष्टीकरण देखील आठवले यांनी दिलं. 


'पवारांनी एनडीएमध्ये यावं


'शरद पवार साहेबांनी एनडीए सोबत यायला पाहिजे, मी आलो आहे तर पावर साहेबांनी यायला हरकत नाही. शरद पवार यांनी आता ठोस पणे निर्णय घ्यावा. शरद पवारांनी आमच्या सोबत यावे', असं मतदेखील मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. 


रामदास आठलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला.. 


उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या जहरी टीकेवर बोलताना, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, ठाकरे हे आपले मित्र आहेत, तसेच ठाकरे सुसंस्कृत देखील आहेत. पण त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं.


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात आता काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यावर नेते मंडळींची काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या 


Ratnagiri Refinery Survey: आधी लाठीचार्ज मग चर्चेचे आवाहन; बारसूत आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाकडे ग्रामस्थांची पाठ