Jayant Patil : राज्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपला खोचक शब्दात टोला लगावला आहे. बाजार समित्यांमधील 'मविआ'चे यश राज्यातील जनतेचा कौल दाखवून देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्या अशी टीका करण्यात आली. परंतु ही वज्रमूठ अभेद्य आहे आणि फार मोठ्या क्षमतेची असल्याचे विरोधकांना कळले असावे असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचे शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. 


सांगली जिल्ह्यातील बाजार समित्या जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील असून इथेही मविआने 18 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आणि सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी किती भक्कमपणे व एकत्रित सक्षम राहिल्यावर काय करुन दाखवते हे आज स्पष्ट झाले असेही जयंत पाटील म्हणाले. पाटील यांनी 148 बाजार समित्यांपैकी 75 पेक्षा जास्त बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. राज्यातील ग्रामीण जनतेने हे घवघवीत यश महाविकास आघाडीच्या मागे उभे केलं असल्याचे सांगितले. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. 


बाजार समितीच्या निवडणुका अधिक किचकट करण्याचा प्रयत्न


शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बाजार समितीच्या निवडणुका किचकट करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केला. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी जनमत किती मोठे आहे हे दाखवून दिल्याचा टोला त्यांनी लगावला. कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. पदवीधर मतदानात सुशिक्षित लोकांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि आज ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणारे सदस्य, सोसायटी सदस्य, व्यापारी या सर्वच घटकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिल्याचे ते म्हणाले. 


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ऐक्याने दणदणीत विजय


दरम्यान, सांगली बाजार समितीवर महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला असून एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ऐक्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनेलला हा मोठा विजय मिळाला. या निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील यांना मात्र पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या