सांगली : आरक्षणावरून मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी समाज (OBC Reservation) आमनेसामने आला असतानाच आता धनगर समाजानेही (Dhangar Reservation) शड्डू ठोकला आहे. राज्य सरकारला दिलेल्या 50 दिवसांचा अल्टीमेटम संपल्यानंतर उद्या सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून उद्या राज्यभर धनगर बांधवाना शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याचं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यभर निवेदन देण्याचं आवाहनं त्यांनी केलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर स्वतः मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. धनगर समाजाने सरकारला 50 दिवसाची दिलेली मुदत संपल्याने सरकारला समाजाची भूमिका कळावी, सरकारपर्यंत समाजाचा आवाज जावा आणि सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
5 कोटी धनगर समजाच्यावतीने इशारा देतोय
दुसरीकडे, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गंभीर इशारा दिला आहे. "तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी", असा इशारा पडळकरांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने 50 दिवस दिले होते, ही मुदत संपली आहे. तरीही या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे, अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे.
समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे. योग्य पावलं उचलत धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा, अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम 5 कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या