(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : शहरातील पावसाळी समस्यांसाठी 'ऑन द स्पॉट' कार्यप्रणाली, सीओसीमधून आयुक्तांनी घेतला आढावा
मनपा मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये 0712-2567029, 0712-2567777 किंवा अग्निशमन केंद्रामध्ये 0712-2540299, 0712-2540188 यासह 101 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
नागपूर : गुरूवारी आणि आज शुक्रवारी शहरात अनेक ठिकाणी दिवसभर पाऊस सुरू होता. शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले. रस्त्यावरील पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अशा स्थितीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मनपा मुख्यालयातील 'सिटी ऑपरेशन सेंटर' (सीओसी) गाठले आणि शहरातील परिस्थितीची पाहणी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांनी थेट सीओसी मधूनच अधिकाऱ्यांना निर्देश देत तात्काळ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. मनपा आयुक्तांच्या या 'ऑन द स्पॉट' कार्यप्रणालीमुळे शहरातील अनेक भागात नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाळ्याचा दावा मनपाच्यावतीने करण्यात आला.
अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमधून पाहणीदरम्यान मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय मानकर, अग्निशमन विभागाचे उपमुख्य अधिकारी बी.पी.चंदनखेडे, नागपूर स्मार्ट सिटीच्या ई-गव्हर्नन्सचे डॉ. शील घुले, अनूप लाहोटी आदी उपस्थित होते.
शहरातील परिस्थीवर 3600 कॅमेऱ्यांची नजर
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर उभारण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या 3600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगरानीत शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसह प्रसंगी उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीवर सीओसीमध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर'च्या माध्यमातून कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. गुरूवारी आणि आज शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मुसळधार पाऊस आल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे ओळखून मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सुरक्षात्मक कार्यवाहीकडे प्राधान्याने लक्ष दिले. शंकरनगर, मानेवाडा रोड, ऑटोमोटिव्ह चौक, कृपलानी चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड, मेडिकल चौक, विटाभट्टी चौक, कळमना, पारडी यासह शहरातील अन्य भागांचीही आयुक्तांनी पाहणी केली.
दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे मनपाचे नियंत्रण कक्ष, लाईव्ह सिटी ॲप आणि सोशल मीडियावरून मनपाकडे नागरिकांच्या पाणी साचण्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. आयुक्तांनी यावर दखल घेत संबंधित भागाची सीओसीमधून पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना निर्देश देउन घटनास्थळावर कर्मचारी पाठवून कार्यवाही करण्यात आली. प्रशासनाद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीवर मनपा आयुक्त सीओसी मधून स्वत: लक्ष ठेवून होते, हे विशेष.
या हेल्पलाइन क्रमांकावर करा संपर्क
सुरक्षेच्या दृष्टीने शहरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारे नागरिकांना दिलासा मिळवून देत त्यांना पावसापासून सुरक्षा प्रदान करण्याचे कार्य मनपाद्वारे करण्यात येत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात अग्निशमन विभागाचे 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. या नियंत्रण कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी दोन ते तीन पाळीमध्ये सेवा देत आहेत. आपात्कालीन परिस्थितीसाठी मनपा मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये 0712-2567029, 0712-2567777 किंवा अग्निशमन केंद्रामध्ये 0712-2540299, 0712-2540188 यासह 101 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल. याशिवाय 7030972200 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा आपली समस्या मांडता येणार आहे. नागरिकांनी सहकार्यासाठी मनपाला संपर्क साधावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या