Ratnagiri Rajapur News : मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर आता लोड पडणार आहे. कारण मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग  बॉर्डरवरील हातिवले ( Hativale Toll Naka) हा टोलनाका आजपासून ( मंगळवाळ ) सुरू करण्यात आला आहे. सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे. हातिवले टोलनाक्यावरती टोल वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली होती. 


काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलानाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता.  महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते आणि स्थानिकांनी घेतली होती. यावेळी झालेले आंदोलन हे भाजपचे नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात झालं होतं. पण त्यानंतर आजपासून टोलवसुली सुरू करण्यात आली. पण अद्याप याला कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे यापूर्वी झालेला विरोध हा राजकीय सोयीनुसार झाला होता का? असा सवाल उपस्थित होतोय. शिवाय सध्या स्थानिक टोल वसुलीच्याविरोधात असले तरी आगामी काळात या विरोधात जनआंदोलन उभे राहणार का? टोल वसुलीबाबत कोकणवासियांची भूमिका काय? हेही येणाऱ्या दिवसांत आपल्याला दिसून येईल.


दरम्यान 22 डिसेंबरला राजापूरच्या हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्याचा प्रयत्न झाला. माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane) यांच्यासह सर्वपक्षीय नेते थेट टोलनाक्यावर धडकले. यावेळी त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोवर टोलवसुली करायला देणार नाही असा इशारा दिला होता. निलेश राणे यांनी थेट केंद्रीय मंत्री, राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना फोन करून टोल वसुलीला आमचा नेमका विरोध का? याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने निलेश राणे यांनी थेट केबिनला कुलूप लावण्याचा इशाराही देण्यात आला होता. 


हातीवले टोल नाका दर


वाहनाचा प्रकार            वनवे जर्नी   रिटर्न जर्नी      

 

कार                               90                 130

एलसीवी / एलजिवी        140               210

ट्रक, बस                        295               445

3 एक्सल                        325               485

HCM, EME                   465               695

ओव्हर साईझ एक्सल      565               850

 

 

वाहनाचा प्रकार          स्थानिक वाहन  महिना  दर    

 

कार                                45                2920

एलसीवी / एलजिवी          70                4715

ट्रक, बस                        150                9880       

3 एक्सल                        160               10775

HCM, EME                    230              15490

ओव्हर साईझ एक्सल       285              18860

मुंबई-गोवा महामार्गचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार, जानेवारी 2024 मध्ये वाहतूक सुरु होणार 


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai-Goa National Highway) काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार असून, जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली. त्यानंतर ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


संबंधित बातम्या


कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली, राजकीय पक्ष आक्रमक


मुंबई-गोवा हायवेवरील ओसरगावसह हातीवले टोलनाक्यावर पोलीस संरक्षणात वसुली करण्याचे आदेश