Nitin Gadkari : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai-Goa National Highway) काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार असून, जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली. त्यानंतर ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. 


नवीन तीन प्रकल्पांची घोषणा


जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट बंदराला दिल्लीशी जोडणाऱ्या मार्गासह 15 हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणाही नितीन गडकरी यांनी केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे-करंजाडे हा जेएनपीटीवरुन जाणारा 13,000 कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल.


कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग 


पनवेल-इंदापूर टप्प्यासाठी भूमी अधिग्रहण आणि पर्यावरण परवानग्या यामुळेही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उशीर झाल्याचे नितीन गडकरी म्हणाले. आता यातील सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. कर्नाळा अभयारण्याच्या परिसरात उड्डाणपूल काढून पर्यावरणाची काळजी घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळं पर्यटन विकासाला चालना मिळेल असेही गडकरी म्हणाले. तसेच प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा मार्ग असल्यामुळं औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले. 


प्रकल्पाची एकूण 10 पॅकेजेसमध्ये विभागणी


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या प्रकल्पाची एकूण 10 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेसचे (P-9, P-10)  जवळपास 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 पॅकेजेस असून यापैकी 2 पॅकेजेस (P-4, P-8)चे अनुक्रमे 92 टक्के आणि 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. दोन पॅकेजेस (P-6, P-7) साठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेस (P-2, P-3) चे अनुक्रमे 93 टक्के आणि 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. पॅकेज (P-1) चे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले. 


रायगड जिल्ह्यातील पळस्पे गावात 414.68 कोटी रुपये किंमतीच्या आणि 63.900 किमी लांबीच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या प्रकल्पांमुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि दिघी या दोन बंदरांवर आर्थिक गतिमानतेला चालना मिळेल. तर, पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे प्रवास गतीमान होईल आणि इंधनाची बचत होईल असे गडकरी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम काम युध्दपातळीवर पूर्ण करा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश