Ratnagiri News : अल्पवयीन (Minor) मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, वारंवार तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या 33 वर्षीय तरुणाला रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा पॉक्सो न्यायालयाने (POCSO Court) 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शिवाय 26 हजार रुपयांचा दंड देखील न्यायालयाने यावेळी ठोठावला आहे. निलेश देवजी गुरव असं या 33 वर्षीय आरोपीचं नाव आहे. 


नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यानची घटना


मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीतील आहे. या प्रकरणी राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह टीमने केलेला तपास, मिळालेले पुरावे या आधारे ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 


गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड, पालकांची पोलिसात धाव


आरोपी निलेश हा पीडितेच्या ओळखीतील होता. पीडितेच्या घरी त्याचं येणं-जाणं होत असे. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून निलेश तिच्या घरी गेला. यावेळी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. शिवाय, कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. आरोपीने जानेवारी 2021 मध्ये पुन्हा एकदा ही संधी साधली. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधत त्याने पुन्हा एकदा अतिप्रसंग केला. या दरम्यान, पीडित गर्भवती राहिली. तिने याबाबत कुटुंबियांना सांगितलं. यानंतर पालकांनी तडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर नाटे पोलीस ठाण्यात त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 


15 साक्षीदारांचा जबाब, आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास


या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांकडून दोषारोप दाखल करण्यात आले. शुक्रवार दिनांक 31 मार्च रोजी या खटल्याचा निकाल लागला. यामध्ये रत्नागिरी जिल्हा पॉक्सो न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास आणि 26 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. 15 साक्षीदार यामध्ये तपासले गेले. सरकारतर्फे मेघना नलावडे यांनी यावेळी युक्तिवाद केला. हा निर्णय वैजतीमाला राऊत यांनी दिला. पैरवी अधिकारी म्हणून दिगंबर ठिक यांनी काम केलं. 


रत्नागिरीत विशेष पॉक्सो न्यायालय


बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पॉक्सो) प्रलंबित आणि नवीन दाखल होणारे खटल्याचे निर्णय जलद गतीने लागावेत यासाठी रत्नागिरीत जिल्हा न्यायालय या ठिकाणी ऑक्टोबर 2020 मध्ये विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त महिला सत्र न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष सरकारी वकील म्हणून मेघना नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.