Sindhudurg News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगावसह रत्नागिरी जिल्ह्यातील हातीवले टोलनाक्यावर टोलवसुलीला असलेला विरोध डावलून पोलीस संरक्षणात सक्तीने टोलवसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नॅशनल हायवे ऑथोरिटीचे कोल्हापूर येथील डीजीएम तथा प्रोजेक्ट डायरेक्टर व्ही. डी. पंदरकर यांनी टोल ठेकेदार करीमुन्नीसा कंपनीला दिले आहेत. रखडलेली टोलवसुली पोलीस संरक्षणात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात दोन्ही टोलनाक्यावर टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात mh07 गाड्यांना टोल माफी मिळावी अन्यथा टोल वसुली करु देणार नाही, असं म्हणत आंदोलन केले. मात्र आता तर पोलीस बंदोबस्तात दोन्ही टोल नाक्यांवर टोल वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


1 जून रोजी टोल वसुलीला स्थगिती
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीमधील ओसरगाव येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 1 जूनपासून टोल वसुली करण्याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. मात्र महामार्गाचे अपूर्ण असलेले काम आणि सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल माफीतून सूट देण्याची मागणी या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा आणि जनतेचा टोल वसुलीला असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन काढण्यात आलेला टोलवसुलीचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर संबंधित सर्वांची एकत्रित बैठक घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.


नॅशनल हायवे ऑथोरिटीचे कोल्हापूर येथील डीजीएम तथा प्रोजेक्ट डायरेक्टर व्ही. डी. पंदरकर यांनी टोल ठेकेदार करीमुन्नीसा कंपनीला टोल वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज पोलीस संरक्षणात सक्तीने टोलवसुली केली जात आहे.


शिवसेना-भाजपचा विरोध
टोलवसुली सुरु कराल तर शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला होता. तर भाजपच्या वतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन टोलवसुली सुरु करण्यास तीव्र विरोध दर्शवत महामार्गाचे सर्व काम पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळत नाही तोपर्यंत टोल वसुली करु नये. अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा दिला होता. 


संबंधित बातम्या


टोल वसुलीला स्थगिती देऊनही सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेचं आंदोलन


सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरील टोलवसुली तूर्त स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच निर्णय