एक्स्प्लोर
भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र लोहारांचा उत्तम पर्याय
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन, पाचोरमधील राजेंद्र लोहार यांनी भंगारातून 13 हजारात नॅनो ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. हा नॅनो ट्रॅक्टर केवळ दीड लिटर पेट्रोलमध्ये एक एकर शेतातील सर्व कामे करु शकतो.

जळगाव : अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली नाही. कमी उत्पन्नामुळे हे शेतकरी ट्रॅक्टर किंवा बैलजोडीही खरेदी करू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी पाचोऱ्याच्या डोकेबाज माणसानं तोडगा काढलाय. राजेंद्र लोहार या माणसानं भंगारातून नॅनो ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील राजेंद्र लोहार यांचे 25 वर्षांपासून फेब्रिकेशनचे वर्कशॉप आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या वस्तू आणि अवजारे दुरुस्तीसाठी आणतात. या दुरुस्तीच्या काळात अनेक शेतकरी बैलजोडी आणि ट्रॅकटर अभावी त्यांना येणाऱ्या अडचणी या लोहार यांना सांगत असतात. शेतकऱ्यांच्या अडचणींचं गांभीर्य लक्षात घेऊन, राजेंद्र लोहार यांनी लहानात लहान शेतकऱ्याला परवडेल, अशा किमतीत नॅनो ट्रॅक्टर बनविले आहेत. हे ट्रॅक्टर शेतीमधील नांगरणी, वखरणी, फवारणी आणि पेरणीसारखी सर्व कामे करणारे असल्याने, शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. एका व्यक्तीला सहज हाताळता येणारा, हा नॅनो ट्रॅक्टर भंगार बाजारातील जुन्या वाहनांच्या स्पेअर पार्टपासून तयार करण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर तयार करण्यासाठी लोहार यांना केवळ 13 हजार रुपये खर्च आला आहे. केवळ दीड लिटर पेट्रोलमध्ये हा ट्रॅक्टर एका एकर शेतीमधील सर्व कामं करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला हा ट्रॅक्टर परवडणारा असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी राजेंद्र लोहार यांच्याकडे या ट्रॅक्टरची मागणी केली आहे.
आणखी वाचा























