Maharashtra Landslide :  राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरु झाला आणि गुरुवारची पाहाट महाराष्ट्रासाठी (Maharashtra) अत्यंत वाईट ठरली. दाट धुक्याची चादर पसरलेल्या सह्याद्रीचं इतके दिवस सौंदर्य दिसत होतं पण आता हाच सह्याद्री  घात करणार ठरला. बुधवारी रात्री शांत निजलेल्या इर्शाळवाडीचं अवघ्या काही क्षणांमध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला.


इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली आणि अनेकांनी त्यांच्या आप्तस्वकियांना गमावलं. घटनास्थळी मुसळधार पाऊस सुरु असल्यानं आणि मोठ्या प्रमाणावर धुकं असल्यानं बचाव कार्यासाठी देखील अनेक अडचणी निर्माण होत होत्या. 


खरंतर अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्र सुखावला. पण मंगळवारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मात्र बुधवारी कहरच केला. मुंबई, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये या पावसाने अगदी कोसळधार बॅटींग सुरु केली. इर्शाळवाडीच्या घटनेवरुन दोन घटनांची अगदी प्रकर्षाने आठवण येते. ते म्हणजे माळीण आणि तळीये गाव.


शांत निजलेल्या या गावांनाही माहित नव्हतं की पाऊस त्यांच्या पहाटेवर अशा पद्धतीने आघात करेल. या तिन्ही गावामध्ये ही घटना घडण्याआधी विक्रमी पावासाची नोंद करण्यात आली होती. हाच विक्रमी पाऊस या गावांसाठी अत्यंत वेदनादायी ठरला. 


इर्शाळवाडीमध्ये गेल्या दोन दिवसांत 770 मिमी पावसाची नोंद


बुधवारी रात्री इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशाकीय यंत्रणा तात्काळ कामाला लागली. इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसेलंली ही वाडी इर्शाळगडावर येणाऱ्या अनेक ट्रेकर्ससाठी आश्रयाचं स्थान होती. मात्र आज याच इर्शाळवाडीला आश्रयाची गरज आहे. याच इर्शाळवाडीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये  770 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता.


पण या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचं सावट आलं. या दुर्घटनेमध्ये जवळपास 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेचे बचाव कार्य करताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा देखील मृत्यू झाला आहे. जवळपास 100 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक जण या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रशासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


तळीयेमध्ये 5  दिवसांत  550 मिमी बरसला


रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात तळीये गावामध्ये 22 जुलै 2021 रोजी दुपारी साडेचार वाजता दरड कोसळली होती. अवघ्या 24 तासात हे गाव मातीच्या ढीगाऱ्याखाली गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं. . दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली.तळीयेमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता.


अवघ्या पाच दिवसांत तळियेमध्ये 550 मिमी पावसाची नोंद झाली होती. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले. पण जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला.


माळिणमध्ये तीन दिवसांत  550 मिमी पाऊस


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे एक आदिवासी भागातील गाव. पुण्यातून 75 ते 80 किमी अंतरावर डिंभे धरणाच्या परिसरात हे गाव वसललं होतं. सलग तीन दिवस जवळपास 550 मिमी पाऊस बरसला आणि माळिण गाव उध्वस्त झालं. एसटी चालकामुळे ही घटना सर्वांना समजली. मुसळधार पाऊस सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. सहा दिवसात जवळपास 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले. 


हे ही वाचा : 


Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये माळीण आणि तळीये दरड दुर्घटनेची पुनरावृत्ती, काय घडले होतं माळीण आणि तळीयेमध्ये?