Ajit Pawar On Khalapur Irshalwadi Landslide : रायगडातील (Raigad) इर्शाळवाडीमध्ये (Irsalvadi) घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलिकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकत नाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हा सरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 


बचावकार्य युद्धपातळीवर


दरम्यान बचावकार्य हे युद्धपातळीवर सुरु असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या घटनास्थळी असल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. सध्या मंत्री अनिल पाटील, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 


जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार : अजित पवार 


हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. पनवेल, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसचे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास 500 ते 700 माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संवाद 


राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या भागांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या भागातील परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या या धोक्याच्या पातळीच्या खाली आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 


अजून किती लोक दुर्घटनेमध्ये अडकली आहेत हे अद्यापही कळलेलं नाही. कारण जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा अनेक लोक घाबरुन दुसरीकडे पळून गेली आहेत. तसचे बेसकॅम्पमध्ये मुख्यमंत्री स्वत: बसून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आली आहे. या घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी अडचण जरी निर्माण होत असली तरी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


हे ही वाचा : 


Khalapur Irshalwadi Landslide : सध्या बचाव कार्याला प्राधान्य, दोन हेलिकॉप्टर तयार, पण खराब हवामानामुळं टेकऑफ अशक्य : मुख्यमंत्री