Khalapur Irshalwadi Landslide : महाराष्ट्राची आजची सकाळ हादरवणाऱ्या दुर्घटनेनं झाली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री दुखाचा डोंगर कोसळला. इर्शाळवाडीवर दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 80 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं आहे. तर शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत. 


इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीखाली अंदाजे 40 घरं दबल्याचा अंदाज आहे. तर अंदाजे 250 ची वस्ती आहे. या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्यानं मृत्यू झाला आहे. तसेच मदतकार्यात सहभागी झालेल्या ट्रेकरचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे तसेच स्थानिक आमदार महेश बालदी तातडीनं दुर्घटनास्थळी दाखल झाले. शिवाय एनडीआरएफची टीमही दुर्घटनास्थळी दाखल झाली. पाऊस आणि अंधारामुळे सुरुवातीला मदतकार्यात अडथळे येत होते. मात्र, उजाडल्यानंतर मदतकार्याला वेग आला आहे. 


इर्शाळगडावरील याच दुर्घटनेबाबत आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन दिलं आहे. फडणवीसांनी आपल्या निवेदनात दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि मदत कार्यासंदर्भाती सविस्तर माहिती दिली. 


विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रायगडमधील इर्शाळवाडी येथे मध्यरात्री दुर्घटना घडली. इर्शाळवाडीला जाण्यासाठी रस्ता नाही, पायी चालत जावं लागतं. गेल्या तीन दिवसांत म्हणजेच, 17 जुलै ते 19 जुलै त्या भागांत 499 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रात्री साडेदहा वाजता ही दुर्घटना घटना घडली आहे. इर्शाळवाडीत 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान सदरची घटना घडली आहे. दुर्घटना घडल्यानंतर 11.30 च्या दरम्यान जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. 12 वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली आणि त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले."


उपमुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, "इर्शाळवाडीची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर इर्शाळवाडी हे चौक माणीवली ग्रामपंचायतीमधील डोंगरदरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. दुर्घटनाग्रस्त वाडी उंच डोंगरावर कपारीत वसलेली होती. या वाडीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून मौजे चौक माणवली या गावातून या वाडीपर्यंत पायी चालत जावं लागतं. वस्ती डोंगराच्या तीव्र उतारावर असल्यानं येथील दळणवळण मुख्य रस्त्याशी जोडलेले नाही. मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर ही जागा आहे. या ठिकाणाहून संपर्क साधणंही कठीण आहे. प्रामुख्यानं ठाकर जमातीचे आदिवासी लोक वाडीमध्ये वास्तव्यास होते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांच्या यादीत समाविष्ठ नव्हते. यापूर्वी सदर ठिकाणी दरड कोसळणं, भूस्खलन होणं अशा घटना घडलेल्या नाहीत."


"इर्शाळवाडीत 48 कुटुंब वास्तव्यास होती. त्यापैकी 25 ते 28 कुटुंब बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 228 पैकी 70 नागरिक स्वतः घटनेच्या वेळी सुरक्षित असल्याचं प्राथमिक माहितीत आढळून आलेलं आहे. तर 21 जण जखमी असून त्यातील 17 जणांना तात्पुरत्या बैसकॅम्पमध्ये उपचार केले आहेत. तर सहा जण पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे." , फडणवीसांनी माहिती दिली. 


"स्थानिक ट्रेकर्स, NDRF चे जवान आणि सिडकोकडून पाठवलेले मजूर यांच्याकडून सिडको मार्फक कारवाई सुरू आहे. बचावकार्यासाठी पुण्याहून रात्रीच NDRF ची दोन पथकं निघून पहाटे चार वाजता घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली. डॉग स्क्वॉडही घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळ अतिदुर्गम भागात असल्यानं डोंगराच्या पायथ्याशीच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 810 819 5554 हा आहे. पनवेलसह स्थानिक ट्रेकर्स ग्रुप बचावकार्यात मदत करत आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स सांताक्रूझ विमानतळावर बचाव कार्यासाठी तयार आहेत. मात्र खराब हवामानामुळे उड्डाण होऊ शकत नाही. स्थानिक प्रशासनानं पायथ्याशी तात्पुरतं हेलिपॅड तयार केलं आहे. तसेच, घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.", अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना ही माहिती दिली.