Irshalwadi Landslide : कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी (Irshalwadi) इथे काल (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड (Landslide) कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 120 ते 130 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 75 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. इर्शाळवाडीमधील दुर्घटनेवरुन माळीण आणि तळीये गावात घडलेली दरड दुर्घटना नजरेसमोर आली. 2014 मध्ये माळीणमध्ये (Malin) दरड कोसळल्याने संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं. तर 2021 मध्ये तळीयेमध्ये (Taliye) अशीच दुर्घटना घडली होती. ज्यात निसर्गाच्या कुशीतल्या या गावात केवळ चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालं. माळीण आणि तळीयेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊया...


माळीण : डोंगर कोसळून गाव गाडल्याची घटना राज्यातील पहिलीच घटना 


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे एक आदिवासी भागातील गाव. पुण्यातून 75 ते 80 किमी अंतरावर डिंभे धरणाच्या परिसरात हे गाव वसललं होतं. त्यावेळी साधारण त्या गावाची लोकसंख्या 750 च्या आसपास असावी. 30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात 44 हून अधिक घरं नागरिकांसह गाडली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. त्यांना बुधवारची सकाळ पाहताच आली नाही. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. एसटी चालकामुळे ही घटना सर्वांना समजली. मुसळधार पाऊस सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. सहा दिवसात जवळपास 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातील व्यक्तीही जिवंत नव्हत्या. प्रशासनाचे त्यांचे अंत्यविधी केले. डोंगर कोसळून गाव गाडल्याची घटना राज्यातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारने ही घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. सरकारने माळीण गावाचं पुनर्वसन केलं.


अन् डोंगराच्या कुशीतील तळीये गाव मातीचा ढिगारा बनलं


रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यातील तळीये गाव 22 जुलै 2021 रोजी दुपारी साडेचार वाजता कोसळलेल्या दरडीमुळे उद्ध्वस्त झालं होतं. डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनलं. दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली. जे कामावर गेले होते तेच जिवंत राहिले, उरलेले सर्व दरडीखाली दबले गेले. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं. तळीयेमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले. पण जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगड पडले, झाडे पडली. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. इथल्या ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र चौथ्या दिवशी बचावकार्य थांबवण्यात आलं आणि बेपत्ता 31 जणांना मृत घोषित करण्यात आलं.