पुण्यातील कोथरूडमध्ये शिरलेल्या रानगव्याचा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मृत्यू, लोकांच्या गोंधळामुळे मृत्यू झाल्याचा वनविभागाचा दावा
पुण्यातील कोथरूड भागात घुसलेल्या रानगव्याचा मृत्यू हा तिथं जमलेल्या लोकांनी गडबड-गोंधळ केल्याने झाल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आला आहे.
पुणे : जंगलात बिनधास्तपणे - बिनदिक्कतपणे वावरणारा गवा मानवी वस्तीत काही तासही जिवंत राहू शकला नाही. पुण्यातील कोथरूड भागात घुसलेल्या गव्याचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये बुधवारी सकाळी रानगवा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या गव्याला बघण्यासाठी आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ हातातील मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची जी गर्दी उसळली त्यामुळे हा गवा बिथरला आणि सैरावैरा पाळायला लागला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या गव्याला पकडण्यात यश आलं खरं पण या सगळ्या गोंधळात गव्याचा मात्र मृत्यू झाला.
सर्वात आधी पुण्यातील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत आज सकाळी हा गवा आढळून आला. त्यावेळी हा गवा एका झाडाखाली शांतपणे उभा होता. लोकांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. परंतु त्याचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवरून पसरू लागताच बघ्यांची गर्दी वाढायला लागली. वनविभाच्या टीमकडूनही या गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु झाले. सोबत वन्य जीव संरक्षक, अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस देखील होते. परंतु आजूबाजूला सुरु झालेल्या गोंधळामुळे हा गवा बिथरला आणि त्याने धूम ठोकली.
वनविभागाने त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले खरे पण गवा सतत जागा बदलत असल्याने आणि लोकांची हुल्लडबाजी सुरु झाल्याने त्यामध्ये यश आलं नाही. जमाव या गव्याचा पाठलाग करायला लागला. या गव्याने महात्मा सोसायटीतून पुणे-बेंगलोर महामार्गाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्याच्या अगदी शेजारून हा गवा पळत पुढे गेला आणि उजवीकडे वळाला. तिथून तो अनेक सोसायट्या पार करत पौड रोडला आला. पौड रोडला चौकातील सिग्नलला थांबलेल्या दुचाकीस्वारांनी त्यामुळे भंबेरी उडाली. सिग्नल ओलांडून गवा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इंदिरा शंकर सोसायटीत शिरला. पाच फूट उंचीची कंपाउंड भिंत या गव्याने झेप घेऊन ओलांडली. सोसायटीला गोल वळसा घालून तो सोसायटीच्या मधोमध असलेल्या पार्किंगमध्ये आला. इथे त्याने आधी एका मारुती अल्टो कारजवळ बैठक मारली. इथे त्याला पकडण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आलं. एका वन्यजीव संरक्षकाने मोठ्या हिमतीने या गव्याच्या गळ्यात दोरखंड फेकला. पण त्यामुळे गवा आणखीनच बिथरला आणि त्याने शेजरच्या कारला टकरा मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे या गव्याच्या तोंडातून रक्तही वाहायला लागलं.
त्यांनतर हा गवा पुन्हा इंदिरा शंकर सोसायटीला वळसा मारून पौड रस्त्यावर आला आणि सिग्नल ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सोसयटीत शिरला. इथे एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये तो घुसला. तिथून पाठीमागून बाहेर पडून त्याने दुसऱ्या एका सोसायटीची कंपाउंड वोल ओलांडून पलीकडे उडी घेतली. इथे मात्र समोर एक कार उभी असल्याने आणि समोर लोखंडी फाटक असल्याने गव्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या. मात्र गव्याने इथेही समोरच्या लोखंडी दरवाज्याला धडाका मारण्यास सुरुवात केल्याने तो अधिकाधिक जखमी होऊ लागला. त्याच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. त्याचबरोबर वनविभागाने गव्हाला पकडण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु केले. गव्याला ट्रॅन्क्विलाइझ करण्यासाठी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर त्याच्या गळ्यात दोरखंड अडकवण्यात आले. काही वेळाने तो खाली बसताच त्याच्या तोंडावर मोठं कापड टाकण्यात आलं. त्यामुळे आजूबाजूचा गोंधळ या गव्यावर परिणाम करणं कमी होत गेलं. त्यानंतर या गव्याचे पाठीमागचे पायही दोरखंडांनी बांधण्यात आले. अखेर या गव्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यानंतर या गव्याला एका ट्रकमध्ये चढवण्यात आलं आणि उपचारांसाठी वनविभागाच्या केंद्रावर नेण्यात आलं . मात्र उपचार सुरु असतानाच या गव्याचा मृत्यू झाला. लोकांनी जो गोंधळ केला, या गव्याचा जो पाठलाग केला त्यामुळे या गव्याच्या शरीराचं तापमान वाढलं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आलाय. उपवनसरंक्षक राहुल पाटील यांच्या मते गव्याला ट्रँक्विलाइज करण्यासाठी इंजेक्शन दिल्यानंतर तो बेशुद्ध होईपर्यंत काही वेळ थांबावं लागतं. परंतु इथे हा गवा बिथरल्याने सतत पळत होता आणि त्यामुळे त्याच्या शरीराचं तापमान वाढून त्याचा मृत्यू झाला.