Walmik Karad: अण्णा सरेंडर करणार असल्याची कुणकुण लागताच वाल्मिक कराडचे समर्थक सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोहोचले अन्...
Walmik Karad: एकीकडे पुण्यातील सीआयडी ऑफीसच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोहोचले आहेत.
Walmik Karad to Surrender at CID Office Today : बीडमधील खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये शरण जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण जाणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर वाल्मिक कराड हे नाव चांगलंच चर्चेचा आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराडचंं नाव समोर आलं होतं. तर मस्साजोग गावातील नागरिकांनी आणि देशमुख कुटूंबाने वाल्मिक कराड या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप केला होता, आज वाल्मिक कराड शरण जाणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. एकीकडे पुण्यातील सीआयडी ऑफीसच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोहोचले आहेत.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मीक कराड गेल्या तीन आठवड्यांपासून फरार आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर अद्याप काही आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा दावा केला जात आहे. वाल्मिक कराडचा शोध सीआयडीकडून घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराड आज शरण जाणार असल्याची माहिती आहे. वाल्मीक कराडचे अनेक कार्यकर्ते सीआयडीच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले. 'आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला', असं समर्थकांचे म्हणणं आहे. हे कार्यकर्ते बीड आणि अहमदनगरवरून आल्याची माहिती आहे.
पुण्यामधून चार सीआयडीची विशेष पथकं वाल्मीक कराडच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पुण्यातून पहाटे 2 तर सकाळी 1 पथक कराडच्या शोधासाठी रवाना झालं आहे. वाल्मीक कराड आज पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण जाणार असल्याची माहिती समोर येत असली, तर सीआयडीकडून तपास आणि शोध सुरूच ठेवण्यात आलेला आहे.
पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार आहेत. ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीत. मात्र, आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेरील हालचालींना वेग आल्याने वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलीसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुण्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराड यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात
वाल्मिक कराड यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून आले होते. वाल्मिक कराड हे उज्जैन येथील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील पेच अभायारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतात का, हे पाहावे लागेल. सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल. वाल्मीक कराड सीआयडीला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सी आय डी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.