(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Annual Sugar Conference : दोन दिवसीय साखर परिषदेला पुण्यात सुरुवात, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, साखर कारखान्यांचा होणार सन्मान
आजपासून पुण्यात दोन दिवसांची वार्षिक साखर परिषद (Annual Sugar Conference) होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं.
Annual Sugar Conference : आजपासून पुण्यात दोन दिवसांची वार्षिक साखर परिषद (Annual Sugar Conference) होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनतर्फे (The Deccan Sugar Technologists Association) ही वार्षिक परिषद होत आहे. या परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित आहेत.
या मान्यवरांचा होणार सन्मान
पुण्यातील जे डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये वार्षिक साखर परिषद सुरु झाली आहे. या कार्यक्रमात अनेक साखर कारखान्यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहेत. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ही साखर उद्योग क्षेत्रातील एक अग्रणी संस्था आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी साखर परिषद आयोजित केली जाते. यावर्षीही या परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या या कार्यक्रमात डॉ. एस. एम. पवार, एन. व्ही. थेटे, सी. जी. माने, डॉ. डी. एम. रासकर, ओ.बी. सरदेशपांडे आणि सी.एन. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच गुजरात येथील गणदेवी साखर खांड उद्योग लि., कर्नाटकमधील उगार शुगर वर्क्स लि. आणि महाराष्ट्रातील जवाहर सहकारी साखर कारखाना लि. या तीन साखर कारखान्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. यावेळी प्रभाकर कोरे, मोहनराव कदम, जयंत पाटील, नवीनभाई पटेल आणि प्रशांत परिचारक यांना यंदाचा साखर उद्योग गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. हे पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
डीएसटीए बद्दल माहिती
दरम्यान, डीएसटीए ही साखर उद्योग क्षेत्रातील एक अग्रणी संस्था आहे. प्रख्यात उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांनी 1936 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील साखर उद्योगाच्या तांत्रिक गरजांची पूर्तता करणे आणि या उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. साखर निर्मिती उद्योगांना डीएसटीए आजही अव्याहतपणे सेवा देत आहे. डीएसटीएची सभासद संख्या दोन हजारांहून अधिक आहे. यामध्ये साखर उद्योगाशी संबंधित तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: