पुणे : संपूर्ण देशात महाराष्ट्र या राज्याची पुरोगामी राज्य म्हणून ओळख असताना काही बाबी मात्र चिंता वाढवणाऱ्या आहेत. एकीकडे हिंगणघाट सारखी घटना जिथे प्राध्यापिकेला भर रस्त्यात जाळून टाकण्यात आले. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातच पुण्या सारख्या जिल्ह्यात ज्याला विद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्या शहरात मुलींचा जन्मदर घटत आहे.

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात मुलींचा जन्मदारात दर हजारी तब्बल 23 ने घसरणं झाली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2016 ते 2019 या कालावधीत जन्मदर घटल्याचे स्पष्ट दिसत आहे.

2016 मध्ये हजारी 932 असणारा मुलींचा जन्मदर 2017 मध्ये 926 होता. तर जन्मदर 2018 मध्ये मुलींचा जन्मदर 927 पर्यंत आला. हाच दर वर्ष 2019 या एकाच वर्षात 904 पर्यंत खाली घसरला आहे.

पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटलं जातं आणि तिथेच मुलींचा जन्मदर खाली घसरल्याने चित्र नक्कीच चिंताजनक आहे. राज्यात गर्भलिंग निदान चाचणीला कायद्यानुसार बंदी आहे. असं असताना मुलींच्या जन्मदरात जर घट होत असेल तर गर्भलिंग निदान चाचणी न करण्याच्या कायद्याची कठोर अमलबजावणी राज्यात होते की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
नुकताच राज्याच्या आर्थिल अहवालात देखील राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात वर्ष 2018 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 35,497 घटना घडल्या. वर्ष 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 37,567 घटना घडल्या. वर्ष 2017 मध्ये बलात्काराचे गुन्हे 4320 होते तर 2018 मध्ये 4974 ते वाढून वर्ष 2019 मध्ये 5412 झाले.

मुलींचे अपहरण आणि पळवून नेण्याच्या घटनांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष 2017 मध्ये 6248 गुन्ह्यांची नोंद झाली होती तर 2018 मध्ये या गुन्ह्यांची संख्या 6825 झाली तर 2019 मध्ये 8382 झाली.