पुणे : एकतर्फी प्रेमातून घडलेल्या जळीतकांडाने अख्खा महाराष्ट्र हादरला असताना या घटना थांबायच्या नाव घेताना दिसत नाहीत. आता तर एका तरुणाने तरुणीसमोरच चक्क गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला बेड्या ठोकल्या. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात ही धक्कादायक घटना रविवार (1 मार्च) सायंकाळी सहा वाजता घडली. घटनेच्या वेळी तरुणीचे नातेवाईकही सोबत होते. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात ही कैद झाली आहे. नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटकही केली. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.


अक्षय भाऊसाहेब दंडवते असं 22 वर्षीय आरोपीचं नाव असून तो पुण्याच्याच खेड तालुक्यात राहतो. त्याचं एका तरुणीवर त्याचं एकतर्फी प्रेम होतं आणि तिच्यासोबत त्याला लग्न करायचं होतं. म्हणूनच काल (1 मार्च) खेडमधून तो जुन्नर तालुक्यातील येडगावमध्ये आला. जांबूतफाट्याजवळ तरुणी नातेवाईकाची वाट पाहत होती. त्याचवेळी अक्षय तिथे आला, नातेवाईकही तिला घ्यायला पोहोचले. तरुणी नातेवाईकांच्या गाडीवर बसताच अक्षयने बंदूक बाहेर काढून मकवायला सुरुवात केली. घरच्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन तू माझ्याशी लग्न कर असा हट्ट अक्षयने धरला. तिने त्याला निघून जायला सांगितलं, तेव्हा अक्षय तिचा हात धरु लागला. यावर तिच्या नातेवाईकाने अक्षयला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो मारेन-मारेन असं म्हणून ब्लॅकमेल करु लागला. तरीही तरुणीने नकार कायम ठेवला, त्यामुळे संतापलेल्या अक्षयने बंदुकीतून जमिनीवर एक गोळी झाडली.

यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तितक्यात तो तिथून पसार झाला. नारायणगाव आणि आळेफाटा पोलिसांनी दोन तासांच्या पाठलगानंतर त्याला अटक केली. अक्षय आणि तरुणी मंचर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होते, तेव्हापासून हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. अक्षय खेड तालुक्याचा तर तरुणी मूळची आंबेगाव तालुक्याची, पण सध्या ती जुन्नर तालुक्यात पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेते आणि तिथेच नातेवाईकांकडे राहते. आजही प्रशिक्षण संपवून ती नातेवाईकांची वाट पाहत होती, तेव्हा अक्षयने तिला गाठलं आणि ही धक्कादायक घटना घडली.