चित्र काढलं नाही म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा झाला असून त्याला नीट बोलणंही अवघड झालं आहे. शाळेने ही गोष्ट प्रसन्नच्या पालकांना कळवली नव्हती.

पुणे : श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल अर्थात एसएसपीएमएस या शाळेतील शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. चित्र काढली नाहीत, या क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने ही मारहाण केली होती. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा उजवा भाग लुळा पडला आहे.
एसएसपीएमएस या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटील या सहावीतील विद्यार्थ्यांने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चिडलेल्या संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर प्रसन्नला त्याने चेहऱ्यावर आणि पोटात मारहाण केली.
शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा झाला असून, त्याला नीट बोलणंही अवघड झालं आहे. शाळेने ही गोष्ट प्रसन्नच्या पालकांना कळवली नव्हती. प्रसन्न दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या घरी आला, त्यावेळी त्याच्या पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शिक्षक आज शाळेत रुजू झाले. त्यावेळी प्रसन्नच्या पालकांनी हा सगळा प्रकार शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने संदीप गाडे याला तातडीने निलंबित केलं आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी दिलं आहे.
प्रसन्नवर बारामतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसएसपीएमएस ही सैनिकी शाळा आहे, त्यामुळे ती कडक शिस्तीसाठी ओळखली जाते. मात्र शिस्तीचा अर्थ अशाप्रकारे अमानूष मारहाण करणं होत नाही, असं प्रसन्नच्या पालकांनी म्हटलं आहे.
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















