(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2019 ला महाविकास आघाडी झाली, ती 2009 मध्येच झाली असती; शिवाजीराव आढळरावांचा गौप्यस्फोट
Shivajirao Adhalarao Patil : 2009 लोकसभेला शिवसेना आणि राष्ट्रवादी युती ठरली होती, असा गौप्यस्फोट शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे.
Shivajirao Adhalarao Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या कार्यकारिणीत उपनेतेपद दिलेले शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी आज शिरूरमधील शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला? हे सांगण्यासाठीच आज बैठक घेतल्याचं शिवाजीराव आढळराव यांनी सांगितलं. गेली अडीच वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याचा घणाघाती आरोपही यावेळी बोलताना आढळराव यांनी केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतील, असंही यावेळी बोलताना आढळरावांनी स्पष्ट केलं.
शिवाजी आढळराव म्हणाले की, "अचानकपणे बातमी आली की, शिवाजी आढळराव हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आणि आता ते शिंदे गटाचे उपनेते असतील. मला फोन सुरू झाले. अनेकांनी अभिनंदन केलं, काहींनी आम्हाला का सांगितलं नाही? असा प्रश्न विचारला. ते सांगण्यासाठी आज बैठक बोलावली. गेली अडीच वर्षे आपल्यावर अन्याय झाले. शिरूर लोकसभेतील तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि अन्य शासकीय अधिकारी भयभीत होते. ते मला रात्री भेटायला यायचे, त्यांच्यावर राष्ट्रवादीचा दबाव होता. ते सांगायचे की, तुम्हाला भेटू नये, म्हणून आम्हाला सांगितलं जातं. एका बाजूला मी आजारी आहे, तरी दुसरीकडे मला मतदारसंघ वाऱ्यावर सोडता आला नाही. का तर ज्यांनी कामं करायची गरज होती. ते मतदारांना उपलब्ध होत नव्हते."
2009 लोकसभेला शिवसेना आणि राष्ट्रवादी युती ठरली होती : शिवाजीराव आढळराव
"2009 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती. तेव्हा मला संजय राऊत म्हणाले की, शरद पवार शिरूर लोकसभा लढवतील, तुम्ही मावळ लोकसभा लढवा. त्यामुळं उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नाही. आपली युतीची बोलणी सुरू आहेत. मग मी म्हणालो आपलं बोलणं सुरू आहे ना? मग दोन दिवसांनी शरद पवारांची सभा आहे, ती पण रद्द करायला सांगा. ते म्हणाले आता आपण त्यांना कसं काय सांगणार? मग मी म्हणालो, मला का सांगताय, असं म्हणून मी निघून आलो. काही वेळानं फोन आला, उद्धव ठाकरे साहेब येतायेत सभेची तयारी करा. मग त्याचवेळी मला शरद पवारांनी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती. मात्र मी बाळासाहेबांना सांगितलं आणि त्यानंतर युतीचा प्रस्ताव फेटाळला गेला. आधी मावळ, आता पुणे नंतर बारामतीतून लढा म्हणाले असते. आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009लाच झाली असती.
मुख्यमंत्री आमचे आणि गुन्हे कोणावर दाखल झाले तर शिवसैनिकांवरच : शिवाजीराव आढळराव
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्हाला खूप आनंद झाला. आता शिवसैनिकांना मोठी ताकद मिळेल, न्याय मिळेल. पण दुर्दैवानं ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्यासोबत आम्हाला मांडीला मांडी लावून बसावं लागलं. तरी आम्ही काही बोललो नाही. पण मुख्यमंत्री आमचे आणि गुन्हे कोणावर दाखल झाले तर शिवसैनिकांवर. उद्धव ठाकरे साहेबांना मी याची कल्पना द्यायचो. एकदाच फक्त अधिकारी माझ्यापर्यंत आले, मात्र त्यानंतर काही प्रतिसादच मिळाला नाही.", असं शिवाजीराव आढळराव म्हणाले.
अजित पवार म्हणाले, जिल्हा परिषद कोणाची? आम्ही म्हटलं नागरिकांची, तर ते म्हणाले... : शिवाजीराव आढळराव
"पंचायत समिती सभापतींच्या निवडणुकीवेळी वाद झाले. माजी सभापती आणि शिवसैनिकांना अटक झाली. उद्धव ठाकरेंना मी सांगितलं पण काही फरक पडला नाही. दिवंगत आमदार सुरेश गोरेंनी पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी आणला. त्यात ही अडवणूक झाली. शेवटी अजित पवारांना भेटायला लागलं. ते म्हणाले जिल्हा परिषद कोणाची आहे? आम्ही म्हटलं नागरिकांची. तर ते म्हणाले राष्ट्रवादीची आहे. त्यामुळं आमदार दिलीप मोहिते म्हणतील तशीच इमारत होईल. तरी आम्ही पाठपुरावा सुरूच ठेवला. कोरोना काळात मुंबईच्या दालनात अजित पवारांनी बैठक बोलावली. तिथून येताना आपले आमदार सुरेश गोरेंना कोरोनाची लागण झाली, यातूनच त्यांचा मृत्यू झाला. तरी ही अद्याप इमारत उभी नाही. आज ही अजित पवार म्हणत होते, आमदार दिलीप मोहितेंच्या म्हणण्यानेच त्या जागेवरच इमारत होईल.", असं शिवाजीराव आढळराव म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, पुणे लोकसभेतून तयारी करा, शिरूर लोकसभा राष्ट्रवादीला द्यावी लागणार : शिवाजीराव आढळराव
"मला फक्त एकनाथ शिंदेंनी निधी दिला. दरम्यान 40 आमदारांनी उठाव केला. ज्यावेळी 40 आमदार गेले म्हणजे, नेतृत्वाचं काहीतरी चुकतंय. पण त्यांना मान्य नव्हतं. तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं मी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा पाहून माझी हकालपट्टी केली. पंधरा वर्ष मी इथं शिवसेनेची ताकद नसताना, खासदार झालो. फक्त शुभेच्छा दिल्या म्हणून हकालपट्टी केली. मग उद्धव ठाकरे म्हणतात, हे चुकीनं झालं. बरं आता मी काय लहान आहे का? मला काय समजत नाही का? तरी मी सोडून दिलं. तरी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं. आम्ही त्यांना म्हणालो फक्त आपण स्वबळावर निवडणूक लढवू, यांची साथ सोडून देऊ, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी सत्तेत येतात, आपल्यामागे तर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे. ते नाही म्हणाले, काय म्हणतात तर, आपल्याला राष्ट्रवादीशी जुळवून घ्यावं लागेल. मग आम्ही म्हणालो, मी काय करायचं, ते म्हणाले पुणे लोकसभेतून तयारी करा. शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी लागणार आहे. आता कसं करायचं सांगा. मी चलबिचल झालो, काही कार्यकर्ते म्हणाले शिरूर लोकसभेतूनच लढायचं. म्हणून संजय राऊतांना फोन केला तर ते म्हणाले तुम्हाला एकदा सांगितलंय ना? मी फोन ठेऊन दिला. आता मला काय पुण्यातून असो की, शिरूर लोकसभेतून कुठूनच तिकीट नकोय. शिवसैनिकांवर राष्ट्रवादीकडून होणारा अन्याय संपवायचा आहे.", असं आढळरावांनी सांगितलं.
"मी हे मुद्दे घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो. तेव्हा काल ते म्हणाले तुम्ही थांबा, तुमच्या मतदारसंघाला आम्हाला भरघोस निधी द्यायचा आहे. त्यावेळी शरद सोनवणेही तिथं होते, मी त्यांना म्हणालो कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय कसा घ्यायचा. तेव्हा शरद सोनवणे म्हणाले, 40 आमदार इथं आहेत, ते तुम्हाला सोबत घ्यायला तयार आहेत. अशा प्रसंगी आपण त्यांना डावलून गेलो तर पुढं काय? पुढचं पुढं बघू आपण आता इथंच थांबू. म्हणून आम्ही तिथं थांबलो. पण आम्ही कुठं काय प्रवेश केला नाही, कारण ही शिवसेनाच आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवरच ते आहेत.", असं ते म्हणाले. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतील, असंही यावेळी बोलताना आढळरावांनी स्पष्ट केलं. एक वाजता बारा पेक्षा जास्त खासदार स्वतंत्र गट स्थापन करतायेत. तेंव्हा उरल्या सुरलेल्यानी सोबत यावं. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राहतील आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतील, असं ते म्हणाले.