Aditya Thackeray : चारशे सोडा भाजपचे दोनशे पार जाणं कठीण; विरोधकांवर आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल
आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे 400 तर सोडा, 200 पार जाणं सुद्धा भारतीय जनता पार्टीला कठीण असेल, असा हल्लाबोल युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
मावळ, पुणे : आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे 400 तर सोडा, 200 पार जाणं सुद्धा भारतीय जनता पार्टीला कठीण असेल, असा हल्लाबोल युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला. ते मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
आमचे मावळ मतदार संघातील भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांना भेटण्यासाठी मी आलो आहे, असं म्हणत त्यांनी भाषणावा सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला जेव्हा समोर पराभव दिसू लागतो किंवा ते जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा तेव्हा ते देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करतात. जातीयवाद उफाळून आणतात किंवा प्रांतवाद निर्माण करतात. परंतु देशासमोर महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्त्वाचे मुद्दे असताना त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत.
पियुष गोयल यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दहा वर्षांनी का होईना परंतु पियुष गोयल यांना महाराष्ट्राची आठवण झाली हे आपले नशीबच समजायचे. त्यांच्याकडे अर्थ, रेल्वे अशी महत्त्वाची खाती होती परंतु त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीही केले नाही. आज देशातील रेल्वे स्थानकांची नावे बदलली जात आहेत परंतु परिस्थिती मात्र अजिबात बदललेली नाही. पियुष गोयल यांनी महाराष्ट्र हिताचे एखादे जरी काम केले असेल तरी ते मला सांगा. कोरोना काळामध्ये 23 मार्च रोजी परप्रांतातील मजदूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करा असा आम्ही आक्रोश करत होतो. तेव्हा या महाशयांना महाराष्ट्राकडे बघण्याची सवड नव्हती, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळविले; आदित्य ठाकरे
ते पुढे म्हणाले की अगदी जून 2022 पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं की वेदांता फॉक्सकोन महाराष्ट्रातच राहील. त्यांनी एखाद्या कॉन्ट्रॅक्टर प्रमाणे वक्तव्य केले होते. कारण त्यांच्या आजूबाजूला नेहमी कॉन्ट्रॅक्टर असतात. तळेगाव येथे होणारा हा प्रकल्प पुढे गुजरातला गेल्यानंतर तो देशाबाहेर निघून गेला. देशात सुरू असलेल्या हुकूमशाही बद्दल देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा तुम्ही सत्य मांडायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावरती गुन्हे दाखल होतात. उद्या जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एखादी सत्यवादी बातमी लिहीलीत तर ही मंडळी पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल करतील.
इतर महत्वाची बातमी-