पुण्यात अटक केलेल्या जुनैद मोहम्मदचं दहशतवादी कनेक्शन, दिल्ली, यूपीत मोठ्या हल्ल्याच्या होता तयारीत
Security Threat In State : पुण्यातून अटक करण्यात आलेला दहशतवादी जुनैद हा त्याच्या साथीदारांसह देशात घातपात करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या चौकशीत समोर आली आहे.
Security Threat In State : पुण्यातून अटक करण्यात आलेला दहशतवादी जुनैद हा त्याच्या साथीदारांसह देशात घातपात करण्याची आणि काही हिंदुत्ववादी व्यक्तींची हत्या करण्याच्या तयारीत होता अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या चौकशीत समोर आली आहे. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात उत्तर प्रदेशातील नरसिंहानंदन सरस्वती, जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिझवी आणि गायक संदीप आचार्य हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते . जुनैदचे आणखी काही साथीदार असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मुंबई - पुण्यासह महाराष्ट्रातील संवेदनशील ठिकाणी तपासणी सुरु केला आहे.
मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या जुनैदला एटीएसने पुण्यातील दापोडी भागातून अटक केली, तेव्हा तो दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. एवढीच माहिती एटीएसकडे होती. मात्र त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर आली. जुनैद, त्याचे सह्कारी इनामुल हक, आफताब हुसेन आणि आफताब हे उत्तर प्रदेशातील धार्मिक नेते नरसिहांनंदन, जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिझवी आणि संदीप आचार्य यांच्या हत्येचा कट रचत होते.
नरसिहांनंदन हे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले असून त्यांना त्यांच्या विधानांनाबद्दल अटक देखील झाली होती. जितेंद्र नारायन हे आधी मुस्लिम होते आणि त्यांचं नाव वसीम रिझवी होतं. मात्र नरसिहांनंदन यांच्या पुढाकाराने त्यांनी धर्मपरिवर्तन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर मुस्लिमांबद्दलच्या वक्त्यव्यांमुळे ते चर्चेत वादात राहिलेत. तर गायक संदीप आचार्य हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रचारक आहेत.
24 वर्षांचा जुनैद बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातून पुण्यात आला होता. पुण्यातील बोपोडी भागात राहून लहान मोठी कामे करताना तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संपर्कात होता. मे महिन्यात एटीएसने त्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीतून काश्मीरमधून दोघांना तर उत्तर प्रदेशमधील शहरनंपूर मधून एकाला अटक केली. पुढे या सगळ्यांकडे केलेल्या चौकशीतून ते देशात हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचं उघड झालं.
जुनैद महाराष्ट्रातील आणखीही काही तरुणांच्या संपर्कात असल्याच एटीएसचं म्हणण आहे. त्यांचा शोध एकीकडे सुरु असताना मुंबई पाठोपाठ पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा वाढवलीय . पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहण्यासाठी असलेल्या व्ही आय पी ना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आलीय . खबरदारीचा उपाय म्हणून बॉंब शोधक पथकाचा वापर होतोय .
एकीकडे तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि दुसरीकडे धमकीचे ईमेल आणि तिसरीकडे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मिळणारी धक्कादायक माहिती यामुळं संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवल्याचं पोलिसांचं म्हणण आहे. नुपूर शर्मा, कॉमेडियन मुनवर फारुखी आणि तेलंगणाचे आमदार टी . राजा यांच्या गेल्या काही दिवसातील वादग्रस्त विधानांमुळे परिस्थिती आणखीनच नाजूक बनली असून सुरक्षा यंत्रणांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागतंय . येणाऱ्या सण आणि उत्सवाच्या काळात तर सुरक्षा यंत्रणांसमोरच आव्हान आणखी वाढणार आहे .
उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, काश्मीर अशा देशातील वेगवगेळ्या राज्यांमध्ये घडणाऱ्या घटनांचे पडसाद आणि परिणाम इतर ठिकाणी उमटल्याचं गेल्या काही काळात जसं पाहायला मिळालं. तसंच वेगवेगळ्या राज्यांमधील दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं आणि देशपातळीवर विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय. त्यामुळं आजच्या सोशल मीडियाच्या काळात कोणत्याही वक्तव्याचे किंवा कृत्याचे परिणाम स्थानिक राहत नाहीत तर किती दूरपर्यंत होतायत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.