Sawai Gandharva Mahotsav Pune 2023 : रजत कुलकर्णी यांच्या गायनाने सवाईच्या तिसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध गाजवला; शनिवारीही दिग्गजांचं सादरीकरण
'सवाई'च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात युवा गायक रजत कुलकर्णी यांच्या अत्यंत तयारीच्या सादरीकरणाने झाली. सवाईच्या स्वरमंचावर या युवा गायकाने प्रथमच संगीतसेवा रुजू केली. मधुवंती रागात त्यांनी 'हू तो तोरे कारन' हा ख्याल मांडला.
Sawai Gandharva Mahotsav Pune 2023 : युवा गायक रजत कुलकर्णी यांच्या (Sawai Gandharva Mahotsav Pune 2023 ) अत्यंत तयारीच्या सादरीकरणाने रसिकांची भरभरून मिळवलेली दाद, हे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या पूर्वार्धाचे वैशिष्ट्य ठरले. ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांच्या परिपक्व गायनाचा आस्वादही रसिकांनी घेतला. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात संपन्न होत आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद यावेळी उपस्थित होते.
'सवाई'च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात युवा गायक रजत कुलकर्णी यांच्या अत्यंत तयारीच्या सादरीकरणाने झाली. सवाईच्या स्वरमंचावर या युवा गायकाने प्रथमच संगीतसेवा रुजू केली. मधुवंती रागात त्यांनी 'हू तो तोरे कारन' हा ख्याल मांडला. 'एरी आयी कोयलिया बोले' या द्रुत बंदिशीतून त्यांच्या तयारीचे, लयकारीचे दर्शन घडले. रजत यांनी पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली म्हणून कन्नड भजन सादर केले. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी 'सावळे सुंदर रूप मनोहर' हा तुकाराम महाराजांचा अभंग अतिशय तन्मयतेने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), माऊली टाकळकर आणि वसंत गरूड (टाळ), वीरेश संकाजी व मोबीन मिरजकर (तानपुरा) यांनी साथ केली.
त्यानंतर ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी सरस्वती रागात 'पिया बिन मोहे' ही बंदिश रूपक तालात सादर केली. तसेच 'माते सरस्वती ' ही स्वरचित बंदिश तीनतालात पेश केली. पद्माताईंनी 'गोपालसारंग' या रागाची निर्मिती केली आहे. या रागात त्यांनी 'संग लीनो बालगोपाल' ही बंदिश त्रितालात सादर केली. हा नवा राग देस राग आणि वृंदावनी सारंग या रागांच्या मिश्रणातून त्यांनी तयार केला आहे. मिश्र पहाडी मधील 'घिर घिर बदरा काले छाये' ही कजरी सादर करून पद्माताईंनी विराम घेतला. त्यांना डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनियम), रामकृष्ण करंबेळकर (तबला) आणि श्रुती देशपांडे व ऐश्वर्या देशपांडे यांनी स्वरसाथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
शनिवारी कोण कलाकार असणार?
16 डिसेंबर 2023| दुपारी 4 वाजता
प्राजक्ता मराठे - गायन
देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार - गायन आणि सतार श्रीमती यामिनी रेड्डी - कुचीपुडी
अभय सोपोरी - संतूर
बेगम परवीन सुलताना - गायन
इतर महत्वाची बातमी-
मोठी बातमी! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित पर्वाचा अस्त