Santosh Deshmukh: देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा; प्रशांत जगतापांचं मोठं वक्तव्य, धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
Santosh Deshmukh Case: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी बीड जिल्ह्यात जो आक्रोश झाला आहे, या आधी असा कधीच आक्रोश पहिला नव्हता. सरकारने प्रकरण नीट हाताळला नाही असा दावा केला आहे.
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे याला कल्याणमधून आणि डॉ. संभाजी वायभसे याला वकील पत्नीसह नांदेडमधून अटक करण्यात आली. अद्याप एक आरोपी फरार आहे, सध्या या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुखांना न्याय मिळावा, यासाठी बीड, परभणी आणि पुण्यात सर्वपक्षीय मोर्चाही काढला जात आहे. यावेळी संतोष देशमुखांना न्याय द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी बीड जिल्ह्यात जो आक्रोश झाला आहे, या आधी असा कधीच आक्रोश पहिला नव्हता. सरकारने प्रकरण नीट हाताळला नाही असा दावा केला आहे.
संतोष देशमुख कर्तुत्वावान होते. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लपवण्याचं काम सरकारने केलं आहे. वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे याने या आरोपींना लपवण्याचं काम केलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियत साफ नाही, खरा आरोपी अजूनही समोर का आला नाही. वाल्मिक कराडसह सगळया आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करा. वाल्मिक कराड वर खुनाचा गुन्हा दाखल झाला तर तो आकाचं नाव घेईल, म्हणून हा गुन्हा दाखल होत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि या प्रकरणी धनंजय मुंडे यांना देखील सहआरोपी करा, धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढून टाका, असंही पुढे प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?,जरांगेंचा सवाल
वाल्मिक कराडसह अन्य दोन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं त्याबाबत आज पुण्यात मोर्चासाठी दाखल झालेल्या मनोज जरांगे यांनी सवाल उपस्थित केले आहेत, मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत. आम्हाला लोक खूप त्रास देत आहेत. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत. हे पळून आले आहेत. धनंजय मुंडेंनी हे सगळं थांबवावे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे गुजरातला; पैसे संपताच मुंबई-पुणे गाठलं
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्याकडून नवी माहिती उघड झालीय. देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे गुजरातला गेले होते. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर प्रकरणातील आरोपी फरार झाले. यात प्रमुख सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी थेट गुजरात गाठले. गुजरात मध्ये पैसे संपल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली नंतर पुण्यात आले. शुक्रवारी रात्री सुदर्शन घुले याच्याशी संबंधित डॉक्टर संभाजी वायबसेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता घुलेने एका मित्राला फोन केला. या कॉल लोकेशन वरून त्याला पोलिसांनी घेण्यात अटक केली. गुजरात मध्ये या दोघांनी नेमका आश्रय कुठे घेतला? याचा तपास देखील केला जात आहे.