Chandrakant Patil : संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतलंय; चंद्रकांत पाटील यांचा टोला
Chandrakant Patil on Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून भाजप व किरीट सोमय्या यांच्यावर होत असलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Chandrakant Patil on Sanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेची प्रतिमा बिघडत चालली असून शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतल्यासारखं सुरू असल्याचे वक्तव्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत हे सैरभैर झाले असून त्यातूनच शिवराळ वक्तव्य करत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात आरोपांच्या फैऱ्या झाडण्यास सुरुवात केली आहे. सोमय्या यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरत शिवराळ भाषा वापरली जात आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, एखाद्या माणसाला आपण आजपर्यंत जे केलं ते उघड पडलं तर आपल्यासह कुटुंबीयांवर कारवाई होईल, अशी भीती वाटल्यानंतर तो सैरभैर होतो. अशी स्थिती संजय राऊत यांची झालेली आहे. त्यामुळेच ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजविणारे शिवराळ शब्द वापरतात असे पाटील यांनी म्हटले.
शिवसेना संपवण्याचे कंत्राट
मी गेली दोन दिवस मुख्यमंत्री उद्धवजींना ह्यांना आवरा अशी विनंती करत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. संजय राऊत यांची भाषा ही शिवसेना संपवण्याचं कंत्राट घेतल्यासारखं आहे. यातून शिवसेनेची प्रतिमा बिघडत चालली आहे. गेल्या 27 महिन्यात शिवसेनेचा एकही प्रवक्ता बोलताना दिसला नाही. फक्त एकच प्रवक्ता बोलत आहे. हे एकमेव प्रवक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना, केंद्र सरकारला, राज्यपालांना शिव्या देत आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे बोलायचे पण त्यांची भाषा कडक असायची पण शिवराळ नसायची असेही पाटील यांनी म्हटले. उद्धवजी ठाकरे यांना राज्य चालवायचं आहेत. त्यामुळे त्यांनी बिघडत चाललेल्या संस्कृतीचा व्यवस्थित विचार करायला हवा असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.
केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार
राज्यातील सर्व यंत्रणा भीतीखाली वावरत आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोग यात काही करणार नाही. म्हणून आम्ही राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आम्ही तुमच्यापेक्षाही अधिक शिव्या देऊ शकतो. मात्र, आम्ही शिव्या देणार नाही पण हे त्याच उत्तर नाही, असेही पाटील यांनी सांगितले.