PM modi pune visit : शरद पवारांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, संजय राऊतांचे रोखठोक मत
Lokmanya Tilak Award : शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, असा वक्तव्य शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केलेय.
![PM modi pune visit : शरद पवारांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, संजय राऊतांचे रोखठोक मत Sanjay Raut On Sharad Pawar Lokmanya Tilak Award PM modi pune visit latest marathi news update PM modi pune visit : शरद पवारांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, संजय राऊतांचे रोखठोक मत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/3ce8b2373405fe1588878e5a321e93371690801941018265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, असा वक्तव्य शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केलेय. ते दिल्लीमध्ये बोलत होते. एक ऑगस्ट रोजी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला जाणार आहे, त्या कार्यक्रमाचे शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत. इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढाई सुरु असताना शरद पवार यांच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. इंडियाच्या एकीमध्ये शरद पवार प्रमुख सुत्रधार आहेत, अशा नेत्यांनी मोदींच्या कार्यक्रमात उपस्थिती लावणे, यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये... त्यांनीच लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्याशिवाय याबाबत आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.
आम्ही शरद पवार यांना कोणताही सल्ला देणार नाही. लोकं असंतुष्ट आहेत. लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे, तो स्पष्ट खदखदताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून देशात सुरु असलेल्या राजकारणामुळे लोकांच्या मनात असंतोषाची भावाना निर्माण झाली आहे. हे लोकांना मान्य नाही. त्याचे कर्तेधर्ते असतात त्यांना कोणता पुरस्कार मिळाला.... नोबेल अथवा कोणताही पुरस्कार मिळाला, हा त्यांचा प्रश्न आहे. पुरस्कारासंदर्भात आम्ही कोणताही भूमिका घेणार नाहीत. पण महाविकास आघाडी अथवा इंडियातील नेते तिथे जातात, तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. शरद पवार खूप अनुभवी नेते आहेत, त्यांना हा संभ्रम काय आहे हे आम्ही सांगायला नको.
शरद पवार यांच्याबद्दल संभ्रम आहे, महाविकास आघाडी अथवा इंडियाबद्दल कोणताही संभ्रम नाही. शरद पवार यांच्या भूमिकेविषयी असलेला संभ्रम त्यांनी दूर करायचा आहे. आम्ही एक आहोत... महाविकास आघाडी आणि इंडिया म्हणून आम्ही घट्ट आहोत, असे संजय राऊत म्हणाले. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर असतील, याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणं झाले का, असे विचारले असता संजय राऊत यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, रविवारी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार हे तिन्ही नेते एकाच मंचावर होते. ज्याने त्याने आपापल्या भूमिका ठोकून घ्यायच्या असतात.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)