कृषी खाते झोप काढतेय का? 266 रुपयांची खताची गोणी 800 रुपयांना, संभाजीराजेंचा हल्लाबोल
राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरु असताना कृषीमंत्र्यांनी ग्राउंडवर येऊन काम करणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढतेय का? असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी केला.
Sambhajiraje Chhatrapati on Govt : राज्यात अनेक भागांमध्ये खते बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. याबाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे असे मत स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी व्यक्त केलं. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरु असताना कृषीमंत्र्यांनी ग्राउंडवर येऊन काम करणं अपेक्षित आहे. मात्र, हे कृषीमंत्री whatsapp वर फेसबुकद्वारे जाहीर करुन online तक्रारी मागवत असल्याचे म्हणत संभाजीराजेंनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) टीका केली. 266 रुपयांची खताची गोणी 800 रुपयांना दिली जातेय. शेतकऱ्यांना अशाप्रकारे लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढत आहे का? असा सवाल संभाजीराजेंनी केला.
राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरु
राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांची लूट सुरु असून राज्यकर्त्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे, ग्रामीण भागातील गरीब जनतेकडे लक्ष नसल्याचे संभाजीराजे म्हणाले. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एक व्हॉट्सअँप नंबर प्रकशित केलेला आहे. परंतू, या व्हॉट्सअॅप नंबरवर आपल्या तक्रारींना न्याय मिळण्याची शक्यता वाटत नसल्यामुळं नागरिक आमच्याकडे जास्त तक्रारी करत असल्याचे दिसून येत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरु असताना कृषीमंत्री ग्राउंडवर येऊन काम करणे अपेक्षित आहे. पणहे कृषी मंत्री whatsapp नंबर फेसबुक द्वारे जाहीर करून online तक्रारी मागवत आहेत. हे अपेक्षित नाही. कृषी मंत्र्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करणे आवश्यक असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज्यभरात शेतकऱ्यांना अशाप्रकारे लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढत आहे का? असा सवाल संभाजीराजेंनी केला.
MRP पेक्षा जवळपास तिप्पट दराने खतांची विक्री
स्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकरी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांमधील अनेक सामान्य शेतकऱ्यांनी आमच्याकडे शेतीसाठी लागणारी खते, बी बियाणे, युरिया यांची वाढीव दराने विक्री केली जात असल्याच्या असंख्य तक्रारी केल्या असल्याचे संभाजीराजे म्हणाले. काही ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण करुन कृत्रिम टंचाई देखील केली जात आहे अशी माहिती देखील आम्हाला मिळाली. या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केली आहे. 266 रुपयांना मिळणारी गोणी तब्बल 800 रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली आहे. याबाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील घटनेबाबतचे व्हिडिओ चित्रिकरण केलेले आहे. तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळालेले आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आहे. MRP पेक्षा जवळपास तिप्पट दराने विक्री होत असल्याची घटना अतिशय गंभीर असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट
मागील महिन्यातच स्वराज्यच्या वतीनं राज्याच्या कृषी आयुक्तांना अधिकच्या दराने होत असलेल्या विक्री तसेच बोगस खते व बियाणे याबाबत तातडीने चौकशी करावी मागणी केली होती. याबाबत दोषींवर कठोर कारवाई करावी याबाबत निवेदन सादर केले होते. काही कारणास्तव यानंतर 2 दिवसातच कृषी आयुक्तांची बदली झाली. सद्य स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाहीत. ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरु आहे. याबाबत राज्य सरकारनं तातडीने कार्यवाही केली पाहिजे असे संभाजीराजे म्हणाले.
शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करा
राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. याबाबत स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व भागांमध्ये जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील कठोर कारवाई व्हायला हवी असं संभाजीराजे म्हणाले. मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विमा अग्रीम आणि विम्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: