Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा मागे; वकिलांनी परस्पर दावा केल्यानंतर काँग्रेसच्या सूचना
सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहाता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असा दावा करण्यात आला होता.

पुणे : राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा आता मागे घेण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाकडून अॅड. मिलिंद पवार यांना हा दावा मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा न करता परस्पर पुणे न्यायालयात हा दावा केला होता. तो आता मागे घेण्यात येणार आहे.
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्या खटल्याची सुनावणी बुधवारी पुणे सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणी दरम्यान अॅड. मिलिंद पवार यांनी राहूल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.
काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलकडून आलेल्या सूचनेनंतर गुरुवारी अॅड. मिलिंद पवार हे न्यायालयात पुन्हा अर्ज करुन हा दावा मागे घेणार आहेत. राहुल गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा न करता वकिलांनी हा दावा केल्याची माहिती समोर येत आहे.
राहुल गांधींच्या वकिलांनी दाखल केलेल्या दाव्यामध्ये नेमकं काय?
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली होती. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली.
मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपाचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल.
भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी सावरकर यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहाता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांच्या वकिलांच म्हणणं आहे. राहुल गांधी हे खरे हिंदू आहेत. मात्र जहालमतवादी हिंदूंकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सादर केलेल्या नोटमधे म्हटलंय.
ही बातमी वाचा:



















