एक्स्प्लोर
Advertisement
मृत मुलाच्या शुक्राणूतून सरोगसी, पुणेकर महिलेच्या घरी जुळी मुलं
अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरुन काढण्यासाठी पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने या माऊलीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा जन्म घडवला.
पुणे : उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या तरुण मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं दुःख पदराशी असतानाच पुण्याच्या आईने विज्ञानाच्या मदतीने चमत्कार घडवला आहे. तरुणाच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत राजश्री पाटील यांनी जुळी मुलं प्राप्त केली आहेत.
अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरुन काढण्यासाठी पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने या माऊलीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा जन्म घडवला.
राजश्री पाटील पुण्याच्या दामले प्रशालेत शिक्षिका आहेत. त्यांच्या डोळ्यातले अश्रू म्हटले, तर आनंदाचे आहेत म्हटले तर काळीज पिळवटणाऱ्या दुःखाचे. प्रथमेश या त्यांच्या अत्यंत हुशार मुलाचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. जर्मनीमध्ये पीएचडीसाठी गेलेल्या प्रथमेशला ब्रेन ट्युमर झाला होता.
जर्मनीतच त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र आई राजश्री पाटील यांनी त्याला भारतात आणून मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार केले. अगदी चौथ्या स्टेजला असतानाही प्रथमेशने साडेतीन वर्ष मृत्यूशी झुंज देत आईला सोबत दिली. मात्र अखेर गेल्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली.
त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कशी भरुन काढायची, या विचारात असलेल्या राजश्री पाटील यांच्या मनात एक विचार चमकून गेला. तो म्हणजे प्रथमेशच्या जर्मनीतल्या उपचारावेळी काढलेल्या शुक्राणूपासून मूल मिळवण्याचा.
'माझी मुलगी त्याची फार आठवण काढायची... त्यामुळे मी तिला सांगितलं... मी तुझा दादा तुला परत आणून देईन' असं राजश्री पाटील सांगतात.
राजश्री पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांना मदत केली ती सह्याद्री हॉस्पिटलच्या आयव्हीएफ इन्स्टिट्यूट आणि डॉ. सुप्रिया पुराणिक यांनी. आयव्हीएफ आणि सरोगसीचं तंत्रज्ञान वापरुन डॉ. पुराणिक यांनी प्रथमेशचे शुक्राणू आणि अनामिक दात्याकडून स्त्रीबीज घेऊन त्यापासून भ्रूण तयार केलं. राजश्री पाटील यांच्याच नात्यातील महिलेच्या गर्भाशयात ते वाढवलं. या सगळ्या प्रयत्नांना यश येत 12 फेब्रुवारीला चमत्कार घडला आणि जुळ्या मुलांचा जन्म झाला.
प्रथमेशच्या शुक्राणूंपासून जन्माला आलेल्या या मुलांना राजश्री पाटील या जन्मदात्या आणि पालक म्हणून स्वतःचं नाव देणार आहेत. या जुळ्या मुलांची नावं प्रथमेश आणि प्रिशा ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नियतीने जरी एक मुलगा त्यांच्यापासून नेला असला, तरी मातृत्वाच्या ओढीने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने राजश्री पाटील पुन्हा या दोन मुलांच्या आई झाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement