पुण्यात साईड मिरर नसलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई
मागील वर्षांपासून पुणेकरांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली वाहतूक पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर लगेच कोविड-19 मुळे शहरांमध्ये मास्कची सक्ती करावी लागली.
पुणे : पुणे शहरात दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दुचाकींची संख्या जास्त असल्याने वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनाही तितक्याच घडत असतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून दरवर्षी कोट्यवधींचा दंड वसूल केला जातो. हेल्मेट सक्तीचा मुद्दा पुण्यात गाजला होता. आत पुणेकरांना दुचाकी चालवताना साईड मिरर नसल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
मागील वर्षांपासून पुणेकरांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली वाहतूक पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर लगेच कोविड-19 मुळे शहरांमध्ये मास्कची सक्ती करावी लागली. त्यामुळे मास्क घालणाऱ्या नागरिकांकडून पुन्हा एकदा कोट्यावधी रुपयांची वसुली करण्यात आली. आणि आता पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांकडे बोट दाखवत दंड वसुली केली जाणार आहे. जर तुमच्या दुचाकीला दोन्ही बाजूचे आरसे नसतील तर तुमच्याकडून दोनशे रुपयांचा दंड घेतला जाणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पुणे पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली. शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस दुचाकी अडवून आरसे नसलेल्या वाहनांवर कारवाई करताना दिसत आहे. अनेक दुचाकी चालकांना तर आरसे नसल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचा भंग होतो याची कल्पना देखील नाही. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई करताना वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादावादी होतानाही पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर आता तुम्ही दुचाकीवरून प्रवास करणार असाल आणि तुमच्या दुचाकीला आरसे नसतील तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.
पुणे वाहतूक पोलिसांनी वर्ष 2019 मध्ये पुणेकरांकडून 109 कोटींचा दंड वसूल केला होता. तर गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटातही वाहतूक पोलिसंनी 81 कोटींचा दंड वसूल केला होता. तर यंदाच्या वर्षी पहिल्या 13 दिवसातच वाहतूक पोलिसांनी पुणेकरांवर एक कोटींची दंडात्मक कारवाई केली आहे.