Somatane Toll : जुन्या पुणे-मुंबई हायवेवरील सोमाटणे टोल बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो मावळवासीय रस्त्यावर; पोलीस फाटा तैनात, काय आहे नेमकं प्रकरण?
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल बंद करा, या मागणीसाठी मावळचे नागरिक एकवटले आहेत. सोमटणे टोल हटाओ कृती समितीने तसं आवाहन केल्याने मावळवासीय रस्त्यावर उतरले आहेत.
Somatane Toll : जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील (Old Mumbai-Pune Highway) सोमाटणे टोल बंद करा, या मागणीसाठी मावळचे नागरिक एकवटले आहेत. सोमाटणे टोल हटाओ कृती समितीने तसं आवाहन केल्याने मावळवासीय रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे शनिवारपासून (11 मार्च) टोल हटाओ कृती समितीच्या पुढाकाराने मावळवासीय बेमुदत उपोषणात सहभागी झाले आहेत. एकीकडे हे उपोषण तर दुसरीकडे आज हे आंदोलन करत टोल नाक्यालगतच नागरिक एकत्र आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
टोल वसुली पुन्हा सुरु आणि सोमाटणे टोल हटाओ कृती समिती आक्रमक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर हा टोल नाका आहे. सोमाटणे आणि वरसोली असे दोन टोल नाके 31 किलोमीटरच्या अंतरात आहेत. प्रत्यक्षात 60 किलोमीटरच्या आत एकच टोल नाका असावा, असा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2018 द्वारे अनिवार्य आहे. म्हणूनच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. 2006 मध्ये हा टोल नाका सुरु झाला असून 2019 मध्ये त्याची मुदत संपलेली आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. शिवाय 800 कोटी वसूल करण्याची मुभा असताना प्रत्यक्षात अडीच हजार कोटी वसूल केल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. म्हणूनच सोमाटणे टोल हटाओ कृती समितीने बेकायदेशीर सुरु असलेली वसुली बंद करावी, अशी मागणी घेऊन अनेकदा आंदोलन छेडली आहेत. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी या टोल नाक्यावरुन स्थानिकांना विनाटोल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र कालांतराने टोल आकारणाऱ्यांनी पुन्हा वसुली सुरु केली. त्यामुळेच आता पुन्हा एकदा सोमाटणे टोल हटाओ कृती समिती आक्रमक झाली आहे. शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु केलं तर आज मावळवासीय थेट रस्त्यावर उतरले आहेत. याच आंदोलनाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पोहोचणार आहेत. ते टोल नाका बंद करण्याच्या अनुषंगाने नेमकं काय भाष्य करतात का? हे पाहणं म्हत्वाचंं आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
अनेक मावळवासीय रस्त्यावर उतरले आहेत. यात शेकडो नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वादावादी आणि भांडणंदेखील होऊ नये म्हणून या टोल नाक्याजवळ मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.