Pune Rain Update: अतिवृष्टीचा पिंपरीतील मतदारांना फटका, मदतीला आलेल्या आमदार बनसोडेंचा मात्र प्रचाराचा धडाका!
Pune Rain Update: पुरजन्य स्थितीचा आढावा घ्यायला आमदार बनसोडे पोहचले, पण त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आणि घड्याळाचं चिन्ह छपाई केलेल्या छत्र्या त्यांच्या हातात होत्या.
Pune Rain Update: पुण्यासह पिंपरी चिंचवड (Pune Heavy Rain) भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसला आहे. काल अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं अनेकांचे संसार पाण्यावर तरंगताना दिसत होते.पुण्यासह पिंपरी चिंचवडला सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढलं. परिणामी शहराला चहुबाजूंनी पाण्याने घेरलं, अशा परिस्थितीत अजित पवार (NCP) गटाचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) ही नागरिकांच्या मदतीला धावले. पण या दरम्यान त्यांनी आगामी विधानसभेचा प्रचार केल्याचं दिसून आलं आहे.
लालटोपीनगर हा पिंपरी विधानसभेचा भाग आहे. या भागातील पुरजन्य स्थितीचा आढावा घ्यायला आमदार बनसोडे (Anna Bansode) तिथं पोहचले, पण त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आणि घड्याळाचं चिन्ह छपाई केलेल्या छत्र्या त्यांच्या हातात होत्या. सोबत असलेल्या प्रत्येक बॉडीगार्ड आणि कार्यकर्त्याच्या हातात ही छत्री दिसत होती. भरपावसात याचं छत्र्या खाली उभं राहून आमदार बनसोडे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करत असल्याचं दिसून आलं होतं.
इतकंच काय तर महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यांच्या हाती देखील हीच छत्री बनसोडे (Anna Bansode) समर्थकांनी सोपवली होती. पावसामुळे आणि पाणी शिरल्याने उडालेल्या गोंधळात महिला अधिकाऱ्यांच्या लक्षात कदाचित ही बाब आली नसावी. आता या तुफानी पावसाचा फटका बसलेल्या मतदारांना आमदार बनसोडे स्वतः ते ही भरपावसात त्यांच्या मदतीला धावले, त्यामुळं त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे. मात्र अशातचं राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आणि घड्याळ चिन्हाची छपाई केलेल्या छत्र्या सोबतीला आणत, आमदार बनसोडेंनी (Anna Bansode) आगामी विधानसभेचा प्रचार केला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
काल पावसाने निर्माण झालेल्या पुरस्थितीमध्ये काही गणेश मंडळांनी देखील यावेळी मदतकार्य केल्याचं दिसून आलं. काही भागात प्रशासनाकडून मदत मिळत होती. तर काही भागात एबीपी माझाने दाखवलेल्या वृत्तानंतर प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं.
पुणे, पिंपरीतील शाळा, महाविद्यालयाना आज सुट्टी
पुण्याला हवामान विभागाने शुक्रवारी आज (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा ही सूचना केल्या आहेत.