Prashant Jagtap : विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांनी साथ सोडली, प्रशांत जगतापांची काँग्रेसमधून नवी इनिंग सुरू
Prashant Jagtap Resignation NCP Pune: सध्याच्या घाऊक पक्षांतराच्या काळात विचारसरणीच्या मुद्द्यावर दिलेला प्रशांत जगतापांचा राजीनामा हा उठून दिसणारा आहे.

पुणे : दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावरून पक्षाला रामराम करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांकडून जगतापांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी म्हणजे अप्रत्यक्षरीत्या भाजपला मदत करणं आहे असं म्हणत धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या मुद्द्यावर प्रशांत जगतापांनी मागील 26 वर्षांपासून असलेली शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. राज्यात घाऊक प्रमाणात सुरु असलेल्या पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर विचारसरणीच्या मुद्द्यावर दिलेला प्रशांत जगतापांचा राजीनामा म्हणूनच उठून दिसणारा आहे.
प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याची चर्चा फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यातील राजकीय वर्तुळात होतेय. कारण ज्या पुरोगामी विचारसरणीच्या मुद्द्यावर शरद पवारांनी भाजपसोबत युती करण्यास नकार दिला आणि ज्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली त्याच शरद पवारांची साथ पुरोगामित्वाच्या मुद्द्यावर सोडायचं प्रशांत जगतापांनी ठरवलंय.
Prashant Jagtap Resignation : जगतापांची कोंडी झाल्याने राजीनामा
पुणे महापालिकेची निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत मिळून लढवावी असा शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगतापांचा आग्रह होता. अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी केल्यास आपण आपल्या पक्षाचा राजीनामा देऊ असं त्यांनी अनेकदा जाहीर केलं होतं.
आपली भूमिका पक्ष नेतृत्वाला पटवून देण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची त्यांनी अनेकदा भेट देखील घेतली. मात्र दोघांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यावर प्रशांत जगतापांनी त्यांचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर राज्यातील इतर शहरांप्रमाणे पुण्यातील पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगतापांनी मात्र पुरोगामी विचारधारेच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या सोबत रहायचं ठरवलं. त्यामुळं अजित पवारांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. मात्र महापालिका निवडणुकीत त्याच अजित पवारांसोबत आघाडी करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतल्यावर जगतापांची कोंडी झाली .
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून काँग्रेस पक्षात देखील दोन गट आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आघाडी करण्यास तयार आहेत, तर मोहन जोशींनी त्याला विरोध केला. मात्र अंतिम निर्णय काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीत होणार आहे. त्यानंतरच प्रशांत जगतापांच्या प्रवेशाला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
Prashant Jagtap Career : प्रशांत जगतापांची कारकिर्द
पुण्याच्या वानवडी भागातून दोन वेळा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आलेत.
2016 आणि 2017 ही दोन वर्षे त्यांनी पुण्याचं महापौरपद भुषवलेल आहे.
2024 ची विधानसभा निवडणूक त्यांनी हडपसर मतदारसंघातून लढवली. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्याकडून त्यांना सहा हजारांच्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला
प्रशांत जगताप आणि त्यांचे वडील सुदामराव जगताप हे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले गेलेत.
प्रशांत जगतापांच्या रुपाने पुणे शहर काँग्रेसला एक आक्रमक चेहरा मिळणार आहे. मात्र त्यासाठी वानवडी भागातून पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
राजकारणातून विचारधारा वजा झाली आहे असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे. घाऊक प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरांचा जनसामान्यांना कमालीचा उबग आला आहे. अशा परिस्थितीत प्रशांत जगतापांचं पक्षांतर मात्र उठून दिसणारं आहे. अर्थात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाला मतदार कसा प्रतिसाद देतात हे महत्त्वाचं आहे.























