Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात लष्कराची मदत घेणार; अपघाताचे विश्लेषण केले जाणार
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.
Pune Porsche Car Accident: पुणे: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा (Pune Porsche Car Accident) सखोल तपास सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सध्या कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात विशाल अग्रवालच्या (Vishal Agarwal) मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती.
सदर प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे. आता पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात भारतीय लष्कराची मदत घेण्यात येणार आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोर्शे कारच्या अपघाताचे विश्लेषण केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा अहवाल या खटल्याच्या चाचणी टप्प्यात मदत करेल. या अहवालावरून या वाहनाचा अपघात कसा झाला हे पोलीस न्यायालयाला कळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अग्रवाल पिता-पुत्राविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल
कल्याणीनगर अपघातप्रकरणी चर्चेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने 9 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
विशाल अग्रवाल याच्या मुलासोबत गाडीत असलेल्या दोन मुलांचेदेखील ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचं समोर आलं होतं. भर रात्री ससूनमध्ये दोघेजण गाडीतून येऊन तावरेंच्या सोबत काम करणाऱ्या हळनोर आणि शिपाई सोबत रक्तासंबंधित डिल झाली होती. त्यानंतर या तिन्ही मुलांच्या रक्तगटाशी मिळते जुळते रक्तगट असलेले लोक शोधण्यात आले आणि त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असल्याचंही समोर आलं. त्यानंतर गाडीतून आलेले दोघं आणि रक्त देणाऱ्या तिघांचा सध्या पुणे पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस खोलात जाऊन करताना दिसत आहे. या प्रकरणाचं आता मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. पुढे कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल.