(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : 10 वर्षांचा मुलगा खडकवासला धरणात बुडत होता, तरुणीनं थेट पाण्यात उडी घेतली अन्....
Pune News : पुण्यात एका 10 वर्षांच्या मुलासाठी 25 वर्षीय तरुणी देवदूत ठरली आहे.
Pune News : खडकवासला धरणावर (Khadakwasla dam ) उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून पुणेकर येत असतात. मात्र याच खडकवासला धरणावर आता बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षेसाठी उपाय नसल्याने आणि कर्मचारीदेखील नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात येत आहे. अशीच एक हादरवणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. 10 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडत होता. त्यावेळी आजुबाजूला कोणतीही सुरक्षा नव्हती. या 10 वर्षाच्या मुलासाठी 25 वर्षीय तरुणी देवदूत ठरली आहे.
10 वर्षांचा मुलगा खडकवासला धरणात बुडत होता. त्यावेळी परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर याच परिसरात तिच्या 25 वर्षीय कुटुंबीयांसोबत ट्रिपसाठी आली होती. त्यावेळी तिला मुलगा पाण्यात बुडताना दिसला आणि तिने एकाही क्षणाचा विलंब न करता पाण्यात उडी घेतली. याचवेळी 10 वर्षीय मुलाच्या कुटुंबातील एकजण तिथे उपस्थित होता. त्यानेदेखील तरुणीसोबत 10 वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर दोघांच्या धाडसामुळे आणि तत्परनेने मुलाचा जीव वाचला
सुरक्षा सुविधा कधी उभारणार?
खडकवासला आणि पानशेत धरण परिसरात आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहे. सुरक्षेसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक उत्साही तरुणांचा जीव जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडली तर धरणाचं अंतर शहरापासून दूर असल्यामुळे पोहचायला परिणामी उशीर होतो. त्यामुळे अनेक घटनांमध्ये मृत्यू झाले आहेत, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पर्यटकांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि खोल पाण्यात उतरु नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. येत्या काळात अशा घटना घडू नयेत यासाठी आता अधिकाऱ्यांनी पावले उचलणे आणि सुविधा उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. प्रत्येक पर्यटकाला कोणतीही चिंता न करता निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे.
दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज
खडकवासला परिसरात अनेक ठिकाणी घातक क्षेत्र आहे. या सगळ्या क्षेत्रात योग्य संरक्षण भिंत किंवा फलक लावण्याची गरज आहे. अनेकांचा मृत्यू होऊनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन किंवा इतर विभागामार्फत हे अपघात किंवा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.
यापूर्वीही अशा अनेक घटन घडल्या मात्र...
काही दिवसांपूर्वी खडकवासला धरणात अशीच एक घटना घडली होती. खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. सोनापूर गावाच्या हद्दीत ही घटना घडली होती. त्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र अजूनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही.