शनिवार वाडा प्रांगणातील अनधिकृत दर्गा हटवा; हिंदू महासंघाची मागणी
पुण्यातील शनिवार वाडा प्रांगणातील अनधिकृत दर्गा हटवा, अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे. तसेच प्रताप गडावर जिवा महाले यांचे स्मारक असावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
Pune Shaniwar wada Darga: प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर आता पुण्यात (Pune) शनिवार वाड्याच्या (shaniwarwada) परिसरात असलेल्या दर्ग्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. पुण्यातील शनिवार वाडा प्रांगणातील अनधिकृत दर्गा हटवा, अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे. तसेच प्रताप गडावर जिवा महाले यांचे स्मारक असावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाज्याजवळ (दिल्ली दरवाजा) वाड्याच्या प्रांगणात एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. रोज अनेक मुस्लीम बांधव या दर्ग्यात येतात. त्या दर्ग्यावर चादर चढवतात. दर्ग्याला योग्य कठडे देखील करण्यात आले आहेत. मात्र वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तो असणंही शक्य नाही, असं मत हिंदू महासंघाने व्यक्त केलं आहे.
30 वर्षांपूर्वीचं बांधकाम असल्याचा दावा
या दर्ग्याचं बांधकाम आणि रचना फार जुन्या काळातली असल्याची दिसत नाही. दर्ग्यावर टाईल्सचं काम आहे. त्यामुळे हे बांधकाम किमान 30 वर्षापूर्वीचं आहे, असा दावा ब्राह्मण महासंंघाने केला आहे. हा वाडा पुरातत्व खात्याच्या अधिकार अंतर्गत येत असल्याने त्यांच्याकडून अशा कोणत्याही बांधकामाला परवानगी मिळाली असेल किंवा दिली असेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे हा वाडा हटवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दर्ग्यामुळे सौंदर्याला बाधा
शनिवार वाडा पुण्याची शान आहे. हा परिसर देखील मोठा आहे. अनेक पर्यटक हमखास या वाड्याला भेट देतात. मात्र हा दर्गा असल्याने भविष्यात या ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्याला बाधा होऊ शकते शिवाय हिंदवी साम्राज्यच्या वास्तूचे महत्व कमी होऊ शकते. त्यामुळे दर्गा सदृश छोटं बांधकाम पाडून टाकावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या संदर्भातील निवेदन पुरातत्व विभागाला आणि अतिक्रमण खात्याला दिलं आहे. तसेच सय्यद बंडाची कबर होऊ शकते तर आमच्या जिवा महाले यांची का नाही?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील नाभिक समाजसुद्धा त्यांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त
शनिवार वाड्याजवळ असलेल्या दर्ग्यावरुन आता वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी काही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हिंदू महसंघाला पुरातत्व विभाग नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.