Pune Fire : पुण्यात मंडपाच्या गोडाऊनला भीषण आग; तीन जणांचा होरपळून मृत्यू
Pune News: पुणे शहरातील वाघोली भागामध्ये (Pune Fire) एका गोडाऊनला भीषण आग लागली. यात दुर्दैवाने तीन जणांंचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Pune Fire : पुणे (Pune News) शहरातील वाघोली (Wagholi) भागामध्ये (Pune Fire) एका गोडाऊनला भीषण आग लागली. यात दुर्दैवाने तीन जणांंचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील वाघोली परिसरात अचानक गोडाऊनला आग लागली. रात्री 11:45 च्या सुमारास ही आगीची घटना घडली. हे मंडपाचं गोडाऊन होतं. या गोडाऊनच्या शेजारी 400 सिलेंडर होते. त्यामुळे मोठा स्फोट झाला. ही घटना कळताच अग्निमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत जवानांना तीन कामगारांचे मृतदेह आढळून आले. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
मंडपाच्या गोडाऊनला आग लागली होती. त्याच्या शेजारीच 400 सिलेंडर होते. त्यातील 3 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. आग विझवल्यानंतर या आगीत तीन जणांचे मृतदेह आढळले. हे तिन्हीजण याच गोडाऊनमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. होरपळून तिघांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय तिघांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मोठा अनर्थ टळला...
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग विझवली. या आगीच तीनच सिलेंडरचा स्फोट झाला मात्र शेजारीच 400 सिलेंडर होते. मात्र आज परिणामी लवकर विझवल्याने या सगळ्या सिलेंडरचा स्फोट झाला नाही . त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीच्या घटनेत वाढ
पुण्यात मागील काही महिन्यांपासून आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यात एकाच दिवशी दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. दुसऱ्या घटनेत पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग लागल्याची घटना घडली होती. रात्री दोन वाजता ही घटना घडली. ही आग विझवण्यासाठी सुमारे दोन तास लागले. या आगीत 10 लाखांचं नुकसान झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच बॅंकेतील कागदपत्र जळून खाक झाले आहेत. या आगीचं कारणं अजूनही समोर आलं नाही आहे. मात्र यात बॅंकेचं मोठं नुकसान झाल्याची आणि आर्थिक नुकसान झाल्याचीदेखील माहिती आहे. नेमकं किती नुकसान झालं याची अजून माहिती समोर आलेली नाही.