Pune: पुण्यातील पासलकर कुटुंबाकडे भरते पोपटांची मैफल, जाणून घ्या काय आहे बातमी
पुण्यातील कर्वेनगरमधील पासलकर कुटुंबाच्या घरी दररोज विविध पक्षी गोळा होतात. या पक्षांचं कुटुंबासोबत एक विश्वासाचं नातं निर्माण झालंय.
पुणे: उन्हाळ्यात पाणी आणि चाऱ्याअभावी पक्षांची होरपळ होते. पक्षांची ही अडचण ओळखून पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या पासलकर कुटुंबाने त्यांच्या घराच्या गॅलरीत पक्षांना चारा आणि पाणी ठेवण्यास सुरुवात केली आणि बघता-बघता इथं पोपट आणि इतर पक्षी गर्दी करू लागले .
दररोज पहाटे पासलकरांच्या घरात पोपटांची मैफिल जमते. एक एक करत पोपट त्यांच्या घराच्या गॅलरीत यायला सुरुवात होते आणि बघता-बघता सगळी गॅलरी पोपटांनी भरून जाते. पुण्यातील कर्वेनगरमध्ये पासलकर कुटुंब राहतं त्या इमारतीत आणि आजूबाजूला इतर अनेक कुटुंब राहतात. पण पोपटांना पासलकरांचीच गॅलरी आवडते, कारण इथं त्यांना मिळत असलेलं चारा-पाणी. त्यामुळं हे पोपट इथं विश्वासाने येतात आणि निर्धास्तपणे बसतात. काही पोपटांना रेश्मा पासलकर तर हाताने चारा भरवतात. इतक्या पोपटांमधून प्रत्येकाची आवड-निवडही त्यांना आता ठाऊक झालीय.
भल्या पहाटे सुरु झालेली ही मैफल अनेक तास चालते. पोपटांबरोबरच इथं खारुताई देखील येतात. अधूनमधून इतर पक्षीही हजेरी लावतात. शहरांमध्ये उंच इमारतींमुळे पक्षांना चारा आणि पाणी मिळणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. उन्हाळ्यात तर पक्षांना ही समस्या जास्तच भेडसावते. पासकलर कुटुंबाने त्यांच्यापरीने यावर उपाय काढण्याचा प्रयत्न केलाय. दररोज घरात पक्षी येत असल्यानं ते बाहेर मुक्कामालाही सहसा जात नाहीत.
दररोजच्या येण्यानं या पोपटांचं या कुटुंबासोबत घट्ट नातं तयार झालंय. खायला काय हवं आणि काय नको हे देखील हे पोपट सांगतात.
शहरांमध्ये पक्षी दिसणं हे दुर्मिळ होत चाललंय. पण जर का तुम्ही त्यांच्या चारापाण्याची सोय केली तर ते तुम्हाला घरात पाहायला मिळू शकतात हे या कुटुंबाने दाखवून दिलंय. त्यामुळं तुम्हीही हा प्रयोग तुमच्या घराच्या गॅलरीत करायला हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या: