पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला होणार दंड, शहर स्वच्छतेसाठी पुणे महानगरपालिकेचा निर्णय
प्राण्यांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक परिसर अस्वच्छ होत असून, दुर्गंधी पसरते. त्यामुळे अनेक पादचारी मार्ग, रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
पुणे : पाळीव प्राण्यांना फिरवताना पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर यापुढे पुण्यात (Pune News) मालकाला दंड भरावा लागणार आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांनी विष्ठा केल्यास नागरिकांना चालताना त्रास होत आहेच शिवाय घाणही होत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना फिरवताना मालकाने यापुढे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने (Pune Muncipal Corporation) केले आहे.
घनकचरा विभागाची नुकतीच एक बैठक झाली.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उघड्यावर पाळीव प्राण्यांनी विष्ठा केल्यास त्याच्या मालकाकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यस्थापनाला ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामधे पाळीव कुत्री आणि मांजरांचा समावेश आहे. शहरात कुत्री आणि मांजरांची नोंद करणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर पुणे महापालिकेकडून हे पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. पाळीव प्राण्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी आणि उद्यानांमध्ये घेऊन येतात आणि त्यामुळे सर्वत्र घाण पसरते अशा तक्रारी महापालिकेकडे येण्याच प्रमाण वाढले असून महापालिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यात पहिला दंड कोथरुड भागात आकारण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागांत पाळीव कुत्र्यांचे प्रमाण लक्षणीय असून रोज सकाळी, दुपारी आणि सायंकाळी नागरिक या प्राण्यांना फिरायला घेऊन जातात. कधी रस्त्यावर, पदपथावर, तर कधी बागेत फिरतात. प्राण्यांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक परिसर अस्वच्छ होत असून, दुर्गंधी पसरते. त्यामुळे अनेक पादचारी मार्ग, रस्ते खराब होत आहेत. त्याचा त्रास इतर नागरिकांना होत असल्याने त्यांनी आक्षेप घेतल्यास वाद निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेने या पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे.
नागरिकांना प्राणी पाळण्याची आवड असते शहरात प्राणी पाळण्यासाठी परवान्याची आवश्यकता आहे. अजूनही अनेक नागरिकांनी परवाने घेतलेले नाही. तसेच परवाना देताना प्राणी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, याची काळजी घ्यावी अशी सूचना देखील महापालिकेने दिलेली आहे.
मांजर पाळण्यासाठी पालिकेचा परवाना
घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा (Pune Muncipal Corporation) परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे (Pets) अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.