Pune Landi Kartiki Yatra : कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी आळंदी गजबजली; लाखो भाविक आळंदीच्या वाटेवर
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजापासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे.
![Pune Landi Kartiki Yatra : कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी आळंदी गजबजली; लाखो भाविक आळंदीच्या वाटेवर pune news Lakhs flock to Alandi for Kartiki Ekadashi Yatra Pune Landi Kartiki Yatra : कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी आळंदी गजबजली; लाखो भाविक आळंदीच्या वाटेवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/9feb95dc4814ed0bdd579e80ae93a41c1668671262793442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Landi Kartiki Yatra : संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत हा समाधी सोहळ्याचा सप्ताह असणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी श्रीगुरु हैबतबाब यांच्या पायरी पुजनाने या सोहळ्याला सुरुवात झाली.
10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता
यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे. त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत. निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
पीएमपीएमएलकडून 300 जादा बस
पुणे महामंडळ परिवहन मंडळाकडून आळंदी यात्रेसाठी 17 ते 13 नोव्हेंबरपर्यंत 300 जादा बसचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रात्री उशिरापर्यंत या बस सुरु असणार आहेत. या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक पुण्यात आणि आळंदीत दाखल होतात. त्यांच्या सेवेसाठी दरवर्षी पीएमपीएमएल प्रशासन सज्ज असतं. यात्रेकरुंसाठी या बस रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र रात्री दहानंतर या बससाठी 5 रुपये जास्त तिकीट दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा पास रात्रीच्या संचलनास चालणार नाही आहे.
वाहतूक बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग
पुणे-आळंदी रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मॅग्झिन चौक येथे नाकाबंदी करण्यात येणार असून वाहनचालकांनी पुणे-दिघी मॅग्झिन चौक-भोसरी-मोशी-चाकण मार्गाचा वापर करावा. त्याचबरोबर मोशी-देहूफाटा रस्ता बंद असणार आहे. डुडूळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून मोशी-चाकणशिक्रापूर, मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. चाकण (आळंदी फाटा)-आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटल आळंदी फाटा येथे नाकाबंदी करण्यात येणार असून चाकण-मोशी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे (पुणे बाजुकडे जाण्यासाठी), चाकण-शिक्रापूर-नगर महामार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
वडगाव घेनंद (शेलपिंपळगाव फाटा)-आळंदी रस्त्यावर कोयाळी कमान येथे नाकाबंदी केली जाणार असून वडगाव घेनंद-शेलपिंपळगाव फाटा चाकण-नाशिक महामर्गाने पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा. मरकळ-आळंदी रस्ता (पी.सी.एस. कंपनी धानोरे फाटा येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे, पर्यायी मार्ग मरकळ-सोळू-धानोरे-च-होली खूर्द (पीसीएस कंपनी फाटा) बायपास रोडने च-होली बुद्रुक पुणे, मरकळ-कोयाळी वडगाव घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण या मार्गाचा वापर करावा. चिंबळी-आळंदी रस्ता चिंबळी फाटा येथे नाकाबंदी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)