Pune News : फोनचा नाद लय बेक्कार, जीवही जाऊ शकतो? 21 वर्षीय तरुणीसोबत घडली भयंकर घटना
पुण्यात मोबाईलच्या नादात तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोन उचलण्याच्या नादात 21 वर्षीय तरुणीचा पाचव्या मजल्यावरून पडुन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pune News : तुम्हाला फोन आला आणि तुम्ही फोनवर (Pune Crime) बोलण्यासाठी फार गडबड करत असाल तर थांबा आधी ही बातमी वाचा. कारण रोज हातात असलेल्या या फोनने आणि फोनवर बोलायच्या घाईने तरुणीचा जीव गेला आहे. पुण्यात मोबाईलच्या नादात तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोन उचलण्याच्या नादात 21 वर्षीय तरुणीचा पाचव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील सासवडमधील ही घटना आहे. अनुष्का जगताप असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. 2 एप्रिल रोजी ही घटना घडली.
कसा झाला अपघात?
सासवड परिसरात जगताप हे बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. 2 एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या नवीन बांधलेल्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अनुष्का देखील गेली होती. कुटुंबियांसोबत नवीन बांधकामाची पाहणी करायला गेली असता अनुष्काला एक फोन आला. हाच फोन घेण्याच्या गडबडीत अनुष्का खाली येत असताना पाचव्या मजल्यावरवरुन गंभीर जखमी झाली होती. त्यांनतर या तरुणीला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण याच उपचारादरम्यान या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे जगताप कुटुंबियांवर दुख:चा डोंगर पसरला आहे.
अनुष्काच्या अकाली निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून बीएसस्सी पदविका पूर्ण केली होती. तिच्या निधनाने सासवडसह त्यांच्या मूळ गावात ताथेवाडी येथे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप यांची अनुष्का पुतणी होती. तिच्या कुटुंबियांसोबतच गावात अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोबाईल फोनने घेतला जीव
जगभरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लहानग्या मुलांकडे आज मोबाईल फोन पाहायला मिळतो. बाळ जेवत नाही, रडायला लागलं की पालकं मोबाईल हातात देता. त्यामुळे लहानपणापासूनच मोबाईलचं व्यसन लागतं. त्यामुळे याचा अनेकदा फटका बसतो. अनेकदा आपण मोबाईल वापरताना आजूबाजूला घडत असलेल्या घटनांकडे लक्ष देत नाही. मात्र हातातला मोबाईल फोन अनेकदा आपल्याला बुचकळ्यात पाडू शकतो. अति मोबाईलच्या वापरामुळे मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. आपली मानिसकता बिघडू शकते. त्यात आपण अनेकदा मोबाईलवर फोन आला की उचलण्यासाठी गडबड करतो मात्र हीच गडबड आपल्या जीवावर बेतू शकते.