Pune Metro : पुणे मेट्रोत नव्या स्टेशनची भर; मेट्रो सेवा आता वनाज ते रुबी हॉलपर्यंत; विद्यार्थ्यांना होणार फायदा
पुणे मेट्रोचं उद्घाटन होऊन वर्ष उलटलं आहे. मात्र त्यात मेट्रोचा हवा तेवढा विस्तार झाला नाही आहे. त्यात आता मेट्रो सेवा रुबी हॉल क्लिनीक जवळ एक नवं स्टेशन सुरु करण्याचं महामेट्रोचं नियोजन आहे.
Pune Metro : पुणे मेट्रोचं उद्घाटन होऊन वर्ष उलटलं आहे. मात्र त्यात मेट्रोचा हवा (Pune Metro) तेवढा विस्तार झाला नाही आहे. त्यात आता मेट्रो सेवा रुबी हॉल क्लिनीक जवळ एक नवं स्टेशन सुरु करण्याचं महामेट्रोचं नियोजन आहे. शिवाजीनगर न्यायालयाऐवजी (सिव्हिल कोर्ट) आणखी तीन स्टेशन जोडून वनाझ ते रुबी हॉल दरम्यान सेवा सुरू करण्याची चाचपणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) केली जात आहे. त्यामुळे अनेकांचा मार्ग सुकर होणार आहे. येत्या मार्चपर्यंत ही सेवा सुरु करण्याची महामेट्रोची योजना आहे.
“सिव्हिल कोर्ट इंटरचेंज, मंगळवार पेठ (आरटीओ) पुणे रेल्वे स्टेशनजवळील मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे नागरिकांना पिंपरी चिंचवड आणि पौड रोड, कर्वे रोड मार्गे पुणे रेल्वे स्टेशन, आरटीओ, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत आणि पुणे पोलिस आयुक्तालय येथे सहज जाता येईल. या नवीन मार्गामुळे वाडिया कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, एमआयटी कॉलेज, मॉडर्न कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, एमएमसीसी कॉलेज, आगरकर इन्स्टिट्यूट, गोखले इन्स्टिट्यूट, रानडे इन्स्टिट्यूट, एफटीआयआय आणि आयएलएस लॉ कॉलेज यांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.
सिव्हिल कोर्ट स्टेशन हे पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. जेथे दिवसभरात 30,000 ते 40,000 नागरिक न्यायालयीन कामकाजासाठी येतात. याशिवाय एक लाखाहून अधिक नागरिक 24 तास पुणे रेल्वे स्थानकावर येत असतात. या ठिकाणी मेट्रोचा खूप उपयोग होणार आहे. या दोन ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना मेट्रोमुळे प्रवास सोयीचा होणार आहे. शिवाय या भागातील गर्दी आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा वापर मोठ्या सोयीचा ठरणार आहे. डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजीराजे उद्यान, पुणे महापालिका आणि सिव्हिल कोर्ट आहेतच मात्र याच मार्गावर मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्टेशनही आहे. रुबी हॉल क्लिनीक जवळ स्टेशन करण्याचे नियोजन आहे. या नव्या स्टेशनची भर पडल्याने पुणेकरांचा याचा फायदा होणार आहे.
मागील मार्च महिन्यात मेट्रोचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. वनाज ते गरवारे हा मेट्रोचा टप्पा सुरु करण्यात आला होता. त्यानंतर मेट्रोचे पुढचे टप्पे लवकरच पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र वर्ष उलटून गेल्यावरही मेट्रोचा योग्य विस्तार आणि काम पूर्ण न झाल्याने पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली आहे.