Pune Crime News: कात्रजमध्ये वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक; 5 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पुण्यातील कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथील वृद्ध महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
Pune Crime News: पुण्यातील कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथील वृद्ध महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 5.38 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पारुबाई किसन सावंत असं मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बादल उर्फ सुग्गा बनवारी बिंद याला अटक करण्यात आली आहे.
पारूबाई एकट्या राहत होत्या. आरोपी बिंद हा भिलारेवाडी येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होत्या. 65 वर्षीय पारूबाई या एकट्या राहत असल्याची माहिती होती. 11 जुलै रोजी आरोपी बिंद त्यांच्या घरात घुसला. त्याने त्यांचा गळा दाबून खून केला आणि त्यांनी घातलेले सोन्याचे दागिने आणि कानातले हिसकावले. तसेच त्यांच्या घरातील लोखंडी ट्रंकमधील रोख रक्कम घेऊन पळून गेला, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला होता. आरोपी पुण्यातून पळून उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलीस कर्मचारी धनाजी धोत्रे, राहुल तांबे, आशिष गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याच्यावर नजर ठेवली होती. त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. न्यायालयाने त्याला 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
चोरी केलेलं 6 तोळे सोनं, रोख रक्कम जप्त; दोन मित्रांसह चोराला अटक
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घरातून रोकड आणि दागिने चोरणाऱ्या एका चोरट्याला गुन्हे शाखा आणि बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. 34 वर्षीय मुश्तफा उर्फ बोना शकील अन्सारी, 29 वर्षीय जुनैद रिझवान सैफ आणि 31 वर्षीय हैदर कल्लू शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रोख रक्कम आणि दागिने चोरणाऱ्या अन्सारी याला गुन्हे शाखेने अटक केली, तर अन्य दोन आरोपींना पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली.