निसर्गाला कमी लेखण्याने पुण्यात दोन दुर्घटना, उत्साहाच्या भरात सहा जणांचा मृत्यू
निसर्ग सुंदर आहे ... पण तुम्ही जर या निसर्गाच्या ताकतीला कमी लेखंलंत तर हाच निसर्ग तेवढाच निष्ठुर देखील बनतो हे पुणे जिल्ह्यातील या दोन घटनांनी दाखवून दिलंय .
पुणे: निसर्गाच्या ताकतीला कमी लेखणं किती महागात पडू शकतं हे पुणे जिल्ह्यात (Pune News) घडलेल्या दोन घटनांमधून दिसून आलंय. पहिल्या घटनेत लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील धबधब्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला आहे . तर दुसऱ्या घटनेत ताम्हिणी घाटातील (Tamhini Ghat) प्लस व्हॅलीतील धबधब्यात पोहण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या बॉक्सरचा मृत्यू झालाय. त्यामुळं पावसाळ्यात वर्षा विहारासाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येकानं किती काळजी घेणं गरजेचं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
निसर्ग सुंदर आहे ... पण तुम्ही जर या निसर्गाच्या ताकतीला कमी लेखंलंत तर हाच निसर्ग तेवढाच निष्ठुर देखील बनतो हे पुणे जिल्ह्यातील या दोन घटनांनी दाखवून दिलंय . पुण्यातील हडपसरमधील अन्सारी कुटुंब लोणावळ्यातील नातेवाईकांकडे लग्नानिमित्त गेले काही दिवस मुक्कामी होतं. 27 तारखेला लग्न आणि 29 तारखेला रिसेप्शन झाल्यावर 30 तारखेला हे कुटुंब नातेवाईक असलेल्या सय्यद कुटुंबियांसोबत भुशी डॅममध्ये ज्या धबधब्यातून पाणी येतं त्या धबधब्याजवळ वर्षाविहारासाठी पोहचले . दोन्ही कुटुंबात आंनद ओसंडून वाहत होता. दुपारी धबधब्यात फारसं पाणी नसल्यानं दोन्ही कुटुंबातील दहा जण धबधब्याच्या मधोमध असलेल्या खडकावर खेळत होते . मात्र त्याचवेळी धबधब्यात जिथून पाणी येतं त्या डोंगरावर अवघ्या दहा - ते पंधरा मिनिटांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि पाण्याचा जोर वाढायला लागला .
लोणावळ्यात काय घडले?
एकमेकांना मिठी मारून थांबलेले दहा जण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहायला लागले . सुरुवातीला जिवाच्या आकांतानं एकमेकांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दहा जणांची मिठी सैल होत गेली. दहापैकी पाचजण कसेबसे पोहून किनाऱ्यावर येऊ शकले . मात्र साहिस्ता लियाकत अन्सारी (36 वर्षे), अमिषा आदिल अन्सारी (13 वर्षे , उमेश आदिल अन्सारी (8 वर्षे), अदनान सबाहत अन्सारी (4 वर्षे), मारिया अकील सय्यद ( 5 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोणावळ्यातील या घटनेत वाहून गेलेल्या आणखी एका मुलीचा श्वासोच्छसवास पाण्यात बुडाल्यानं बंद पडला होता . मात्र सुदैवानं तिला जेव्हा पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा तिथे फिरायला आलेले सचिन विटनोर आणि श्रीनिवास गांधारी हे दोन डॉक्टर उपस्थित होते . या दोघांनी तिला श्वासोच्छवास पुरवल्यानं या मुलाचे प्राण वाचू शकले .
धबधब्यात पोहण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याच्या नादात मृत्यू
तर दुसऱ्या घटनेत बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या स्वप्नील धावडे या जिम ट्रेनरचा ताम्हिणी घाटातील धबधब्यात पोहण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याच्या नादात मृत्यू झाला . बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिलेले स्वप्नील धावडे भारतीय सैन्यदलात 18 वर्ष नोकरी करून मागील वर्षी निवृत्त झाले होते . भोसरी भागातील एका जिमममध्ये ते ट्रेनर म्हणून नव्या खेळाडूंना प्रक्षिक्षण देत होते . पावसाळा सुरु होण्यापूर्वी या खेळाडूंना घेऊन ते प्लस व्हॅलीत पाहण्यासाठी उतरले होते. शनिवारी ते आणि त्यांच्यासोबतचे 32 जण पुन्हा प्लस व्हॅलीतील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले . एका खालोखाल तीन कुंडं असलेली ही प्लस व्हॅली नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलीय . इथे सर्वात वरच्या कुंडात पडणारं धबधब्याचं पाणी काहीअंतर गेल्यावर मधल्या कुंडात आणि त्यानंतर सर्वात खालच्या कुंडात पडतं . स्वप्नील धावडेंनी सर्वात वरच्या कुंडातील फेसाळत्या पाण्यात उडी मारली खरी पण गोल - गोल फिरणाऱ्या पाण्याचा वेग इतका होता की बॉक्सिंग मधील राष्ट्रीय खेळाडू राहिलेले स्वप्नील धावडे काठावरील दगडांना पकडून ठेऊ शकले नाहीत आणि पाण्यासोबत वाहत गेले . अखेर सोमवारी त्यांचा मृतदेह सर्वात खालच्या कुंडात सापडला . त्यामुळं वर्षाविहारासाठी बाहेर पडताना निसर्गासोबत मस्ती नाही तर त्याचा आदर करायचा असतो हे या घटनांमधून शिकायचं आहे .
पावसाळा आला की लोक भान हरपतात
निसर्ग सुंदर आहे . तुम्ही जर त्याचा आदर केलात तर तो तुम्हाला तो प्रसन्नता आणि शांतता बहाल करतो . पण त्याच्या ताकतीला कमी लेखण्याची चूक जर तुम्ही केलीत तर हाच निसर्ग अतिशय निष्ठुर आणि निर्दयी बनतो . त्यामुळं पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडताना निसर्गाच्या या दोन्ही रूपाचं भान राखण्याची गरज असते . दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला घडणाऱ्या या अशा दुर्दैवी घटनां पाहून देखील पुढील वर्षी पावसाळा आला की लोक भान हरपतात हे आणखी दुर्दैवी आहे.
हे ही वाचा :