Girish bapat : पुण्यात पुन्हा पोटनिवडणूक होणार की गिरीश बापटांची जागा रिक्त राहणार?
भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुन्हा पोटनिवडणूक होणार का? आणि झाली तर उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल? या सध्या शहरात चर्चा सुरु आहे.
Girish bapat : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यामुळे आता त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात कसब्याची पोटनिवडणूक राज्यभर गाजली आणि आता पुन्हा पोटनिवडणूक होणार का? आणि झाली तर नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल? याच्या सध्या शहरात चर्चा सुरु आहे. मात्र या पोटनिवडणुकीबाबत कायदे तज्ञांचं काय मत आहे आणि जेष्ठ पत्रकार यांना नेमकं काय वाटतं... पाहूयात!
कायदे तज्ञ उल्हास बापट सांगतात की, खासदार गिरीश बापट यांचं निधननंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. वर्षभरानंतर पुढच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कायद्यानुसार ही पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. 1951 सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणूक घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक 2024 मे एप्रिल मध्ये होत आहे. आत्ता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ आहे. त्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागेल आणि ही निवडणूक 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते. विधानसभेची निवडणुकीसारखीच लोकसभेचीही निवडणूक होईल, असंही ते म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले की, कोणत्याही कारणामुळे जागा रिक्त झाली तर त्या जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्याचप्रमाणे गिरीश बापट यांच्या जागीदेखील पोटनिवडणूक जाहीर होईल. ही पोटनिवडणूक जाहीर झाली तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीप्रमाणेच भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असेल. भाजपकडून ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न होणार नाही मात्र बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. भाजप कायम निवडणुकीसाठी तयार असतात. खासदारकीची निवडणूक असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील या निवडणुकीत लक्ष घालतील.
उमेदवार निवडण्याचं आव्हान...
गिरीश बापट यांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका झाल्या तर भाजप आणि महाविकास आघाडी समोर उमेदवाराची निवड हे मोठं आव्हान असणार आहे. विधानसभेच्यावेळी देखील दोन्ही पक्षासमोर उमेदवार निवडीचं आव्हान होतं. त्यानंतर भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला. विरोधकांचा उमेदवार पाहून पक्षाने रणनिती आखली होती. मात्र जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत राजकीय हालचाली संथगतीने सुरु होत्या. त्याच प्रमाणे यावेळीदेखील चित्र बघायला मिळू शकतं. त्यात भाजपकडून काही नावांची चर्चा सुरु झाली आहे आणि ही जागा कॉंग्रेसची असल्यामुळे कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीकडूनदेखील काही नावांची चर्चा आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडून नेमका कोणता उमेदवार दिला जातो त्यात जात आणि धर्मानुसार उमेदवार ठरु शकतो का?, हे पाहणं महत्वाचं असेल.
...तर बिनविरोध होण्याची शक्यता!
अधिक काळ गिरीश बापटांची जागा रिक्त राहणार असेल तर निवडणुका घेणं बंधनकारक आहे. या पोटनिवडणूक जाहीर झाल्या तर बापटांच्या कुटुंबियांमधील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट या दोघांना उमेदवारी मिळू शकते मात्र गौरव हे राजकारणात फार सक्रिय नाहीत त्यामुळे स्वरदा यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. बापटांच्या घरी उमेदवारी दिली तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
उमेदवारी कोणाला मिळणार?
या पोटनिवडणुकीसाठी उमेवाराची निवड करणं हेच पक्षासमोर मोठं आव्हान असणार आहे. यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचं महिला नेतृत्व म्हणून मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा आहे. तर महाविकास आघाडी किंवा कॉंग्रेसकडून अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे किंवा दोन्ही पक्षाकडून नवीन चेहरा उमेदवार म्हणून घोषित केला जाऊ शकतो.
धंगेकरांना उमेदवारी मिळणार का?
कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांनी निवडुन आल्यानंतर गिरीश बापटांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी धंगेकरांना राजकारणासंदर्भातील सल्ले दिले होते. त्यानंतर गिरीश बापटांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजकीय प्रवास करेल, असंही धंगेकर म्हणाले होते. त्यामुळे बापटांनंतर येत्या निवडणुकीत धंगेकरांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी संधी दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र धंगेकरांना कॉंग्रेसकडून खासदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.
ब्राह्मण फॅक्टर गाजेल का?
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्यावेळी ब्राह्मण फॅक्टर गाजलं होतं. त्याचा फटका भाजपला बसेल असं बोललं गेलं. मात्र त्याप्रमाणे काही घडलं नाही. ब्राह्मण उमेदवार पाहून ब्राह्मण समाज मतदान करतील असा संभ्रम होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा संभ्रम दूर झाला कारण ब्राह्मण मुद्दा समोर ठेऊन उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना पार कमी प्रमाणात मतदान झालं. यावेळी जर भाजपकडून ब्राह्मण उमेदवार दिला तर विरोधीपक्षाकडून ब्राह्मण उमेदवाराचा विचार होण्याची शक्यता आहे.