पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याचा मानवी वस्तीमधला वावर आणि माणसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे . मात्र या पकडलेल्या बिबटयांना ठेवण्यासाठी आणि त्यांना इजा झाली असेल तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी राज्यात एकच बिबट निवारा केंद्र आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील या केंद्रात जितक्या बिबटयांना ठेवण्याची क्षमता आहे त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात बिबटे आढळत आहे.   त्यामुळे या केंद्राच्या विस्तारीकरणाचा विचार असून त्यासाठी जलसंपदा विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली आहे.


 पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाच्या कडेला असलेल्या बिबट निवारा केंद्रात सध्या 32 बिबटे वास्तव्याला आहेत . राज्याच्या वेगवगेळ्या भागांमध्ये पकडल्या गेलेल्या बिबट्यांना सुरुवातील इथं आणलं जातं. त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या केल्या जातात आणि या बिबट्यानां कॉलर आय डी बसवला जातो आणि त्यांना पुन्हा निसर्गात सोडलं जात. मात्र काही बिबट्यांना गंभीर जखमा झाल्या असतील तर त्यांना कायस्वरूपी इथेच ठेवायची वेळ येते. अनेकदा ऊसाच्या शेतात बिबट्याची लहान पिल्लं मादीपासून कायमची दुरावतात. अशा पिल्लांसाठी मग हे बिबट निवारा केंद्र हेच कायमच घर बनते.या बत्तीस बिबट्यांपैकी बहुतेक बिबटे इथे वर्षानुवर्षे राहत आहेत. त्यामुळं मानवी वस्तीत शिरलेला एखादा नवीन बिबटा पकडला गेला की त्याला ठेवायचं कुठं हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळं वन विभागाने या बिबट निवारा केंद्राचा विस्तार करायचं ठरवलंय.


 सध्या हे बिबट निवारा केंद्र चार हेक्टरमध्ये आहे. मात्र बिबट्यांची वाढत चाललेली संख्या पाहता आणखी 12.69 हेक्टर जागेची मागणी वनविभागाकडून करण्यात आली आहे . सध्या हे बिबट निवारा केंद्र माणिकडोह धरणाला लागून आहे. या केंद्राच्या शेजारची जमीन जलसंपदा विभागाची असून सध्या ती वापरात नसल्याने ती बिबट निवारा केंद्राच्या विस्तारासाठी मिळावी अशी मागणी वन विभागाकडून करण्यात आली आहे. 


जंगलांचं प्रमाण कमी होत गेल्यानं बिबट्यांनी ऊसाच्या शेतांचा आसरा घेतला आहे. पण आता हे बिबटे पुणे आणि नाशिकसारख्या शहरांच्या रहिवासी भागांमध्ये सातत्याने आढळून येत आहेत.  अनेकदा या बिबट्यांना पकडताना ते जखमी होतात. काहीवेळा चिडलेल्या जमावाकडून  बिबट्यांवर दगडफेक करण्यात येऊन त्यांना जखमी केलं जातं. अशावेळी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काही दिवस त्यांना निवारा केंद्रात ठेवावं लागतं. मात्र सध्या या केंद्रातील जागा हाऊसफुल झाल्याने एखादा नवा बिबट्या इथं उपचारांसाठी आणायचा म्हटला तर अडचण होत आहे. 


 वन विभागाच्या या मागणीला सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून जागेच्या मोबदल्यापोटी जलसंपदा विभागाला द्यावा लागणारा एक कोटी सव्वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्यामुळं या बिबट निवारा केंद्राची क्षमता तिपटीने वाढणार आहे . मात्र जंगलातील बिबटे उसाच्या शेतात येऊन राहू लागल्यानं त्यांचा जन्मदर तीस टक्क्यांवरून थेट नव्वद ते शंभर टक्के इतका वाढला आहे. साहजिकच यामुळं बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . त्यामुळं या बिबट निवारा केंद्राचा आकार कितीही वाढवला तरी तो कमीच पडण्याची शक्यता आहे .  पकडलेले बिबटे उपचारांनंतर पुन्हा निसर्गात सोडणं हाच पर्याय असून त्यासाठी लोकांनी बिबट्यासोबत जगण्याची सवय लावून घेण्याची गरज आहे. 


Mumbai : Aarey च्या जंगलात बिबट्या मानव संघर्ष टोकाला, हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न



संबंधित बातम्या :